नवी दिल्ली – केंद्र सरकार नरेंद्र मोदी यांचे खच्चीकरण करण्यासाठी सीबीआयचा वापर करत असून सीबीआय ही यंत्रणा खोटे साक्षीदार उभे करून नरेंद्र मोदी यांना तथाकथित बनावट चकमकींच्या प्रकरणात आरोपी करण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील नेते अरुण जेटली यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पत्र लिहून अशी तक्रार केली असून सत्ताधारी कॉंग्रेस पक्ष आपल्या राजकीय स्वार्थासाठी सीबीआयचा असा वापर करत आहे, असा आरोप केला आहे.
सीबीआयने यापूर्वी नरेंद्र मोदी यांचे सहकारी अमित शहा यांना कसल्याही प्रकारच्या पुराव्याशिवाय अटक केली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सोडून दिले. असाच प्रकार आता नरेंद्र मोदी यांच्यासाठी सुरू असून काही पोलीस अधिकार्यांनी खोट्या साक्षी देण्यास प्रवृत्त करून नरेंद्र मोदी यांना आरोपी ठरविण्याचा सीबीआयचा प्रयत्न आहे. हा प्रकार थांबवावा असे जेटली यांनी पंतप्रधानांना आवाहन केले आहे.
उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदी यांचे सहकारी अमित शहा हे भाजपाचे प्रचार प्रमुख आहेत आणि राज्यात होत असलेल्या जातीय दंगलींच्या पार्श्वभूमीवर तिथल्या समाजवादी पार्टीच्या सरकारने अमित शहा यांच्या सभांवर बंदी घातलेली आहे. परंतु अमित शहा यांनी बंदीची पर्वा न करता मथुरा येथे होणारी आपली सभा होईलच, असे जाहीर केले आहे. पक्षाचे प्रवक्ते प्रदीप माथूर यांनी ही माहिती दिली.