दयानिधी मारन यांच्यावर गुन्हा

नवी दिल्ली – सीबीआयने माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारन यांच्यावर पदाचा गैरवापर करून टेलिफोन लाईनचा अवैध वापर केल्यासंबंधात गुन्हा दाखल केला आहे. दयानिधी मारन यांनी आपल्या चेन्नईतील निवासस्थानी ३०० टेलिफोन कनेक्शन घेतले आणि नंतर ते त्यांच्या बंधूंच्या सन टीव्ही या वृत्तवाहिनीकडे वर्ग केले, असा त्यांच्यावर आरोप आहे.

सीबीआयने या प्रकरणात प्राथमिक चौकशी केल्यानंतर या आरोेपात तथ्य असल्याचे आढळले. म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला. श्री. दयानिधी मारन यांच्याशिवाय बीएसएनएलचे अधिकारी के. ब्रह्मनाथन् आणि एम.पी. वेलुस्वामी या दोघांवरही गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणात गैरवापर करण्यात आलेल्या ३२३ निवासी फोनजोडण्या बीएसएनएलच्या जनरल मॅनेजरच्या नावावर होत्या आणि दयानिधी मारन यांच्या बोट हाऊस भागातील निवासस्थानापासून सन टीव्हीच्या कार्यालयापर्यंत त्या टाकण्यात आल्या होत्या. त्यांच्यासाठी स्वतंत्र केबल वापरण्यात आली होती.

या संबंधात २००७ साली तक्रार दाखल झाली होती. मात्र चार वर्षानंतर तिची चौकशी सुरू झाली आणि आता अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.