भोपाळ – काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देवून अफजल उस्मानी हा दहशतवादी पळाल्याची घटना ताजी आहे. त्यातच आता मध्यप्रदेशमधील खांडवा येथील सिमी संघटनेचे सहा संशयीत दहशतवादी तुरुंगातून पसार झाले आहेत. या दहशतवाद्यांनी दोघा तुरुंग कर्मचा-यांवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या पळून गेलेल्या दहशतवादाच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
मध्यप्रदेश पोलिसांनी खांडवा जिल्ह्यातील सिमी संघटनेचे सहा कार्यकर्त्यांना नुकतीच अटक केली होती. या तरुणांचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा संशय होता. या संशयीत दहशतवाद्यांना खांडवा तुरुंगात ठेवण्यात आले होते. सोमवारी मध्यरात्री या आरोपींनी तुरुंगातील स्नानगृहाची भिंत तोडून तुरुंगातून पळ काढला. हे दहशतवाद्यी पळून जात असल्याची चाहूल पोलिसांना लागली होती. त्यांना अडविणा-या तुरुंगातील दोघा कर्मचा-यांवरही तीक्ष्ण हत्यारांनी त्यांनी हल्ला केला.
यामध्ये गंभीर झालेल्या दोघा कर्मचा-यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे तुरुंग प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. दरम्यान, या पळून गेलेल्या दहशतवादाच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. त्यांचा सर्वत्र कसून शोध घेतला जात आहे.