संजय दत्तची पॅरोलवर सुटका

पुणे: अभिनेता संजय दत्तची येरवडा कारागृहातून १४ दिवसांसाठी पॅरोलवर सुटका झाली. विभागीय आयुक्तांनी संजय दत्तला सुट्टी मंजूर केली आहे. संजय दत्तची १४ दिवसांच्या पॅरोलवर सुटका झाली असून मंगळवारी सकाळी तो मुंबईच्या दिशेने रवाना झाला. संजयला ४२ महिन्यांची शिक्षा झाली असून पुण्यातील येरवडा कारागृहात गेल्या चार महिन्यांपासून तो शिक्षा भोगत आहे.

अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तला सुप्रीम कोर्टाने पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी संजय दत्तनं दीड वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळं आणखी साडेतीन वर्षाची शिक्षा संजयला भोगायची आहे.

संजय दत्तला मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर शिक्षा भोगण्यासाठी २२ मे रोजी येरवडा कारागृहात हलवण्यात आलं. मात्र तीन महिने उलटताच संजय दत्तने पॅरोलवर सुटण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. त्यासाठी त्याने अर्ज केला होता. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी व हातातील काही सिनेमाचे काम पूर्ण करण्यासाठी संजयने पॅरोलसाठी अर्ज केला होता. अखेर मंगळवारी त्याला १४ दिवसांचा पॅरोल मंजूर झाला.