दिग्दर्शक राजीव पाटील यांचे निधन

मुंबई- आपल्या चित्रपटांतून सामाजिक भान जपणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते तरुण मराठी दिग्दर्शक राजीव पाटील यांचे सोमवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. ते 42 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी आणि मुलगी आहेत. नाशिक येथील मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

राजीव पाटील हे रविवारी रात्री त्यांच्या गोरेगाव येथील म्हाडा कॉलनीतील घरी एकटेच होते. सोमवारी सकाळी एका नव्या चित्रपटासंदर्भात त्यांची लेखक सचिन दरेकर यांच्याशी बैठक ठरली होती. पाटील सकाळी फोन उचलत नसल्याने दरेकर सकाळी त्यांच्या घरी गेले, तेव्हा बेल वाजवूनही पाटील यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे दरेकर यांनी त्यांचे भाऊ प्रशांत यांना फोन केला. प्रशांत यांनी ताबडतोब तेथे पोहोचून आपल्याकडील चावीने दरवाजा उघडला तेव्हा पाटील आपल्या बेडरूममध्ये मृतावस्थेत आढळले.

त्यांना तात्काळ बोरिवली येथील भगवती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मूळच्या नाशिकचे असलेल्या पाटील यांनी जोगवा, पांगिरा, 72 मैल एक प्रवास, अष्टभुजा सप्तशृंगीमाता, ब्लाइंड गेमम, सावरखेड एक गाव, औक्सिजन, सनई चौघडे, या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. यातल्या अनेक चित्रपटांच्या पटकथाही त्यांनी लिहिल्या होत्या. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या जोगवा चित्रपटाला सहा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. वंशवेल हा त्यांचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार होता.

दिग्दर्शक म्हणून राजीव पाटीलचे वैशिष्टय म्हणजे त्याने आपल्या चित्रपटांतून नेहमीच प्रयोगशीलता जपली आणि आपले पक्के सामाजिक भानही. मग तो जोगत्यांची समस्या मांडणारा जोगवा असू दे, गावपांढरीची कर्मकथा सांगणारा पांगिरा असू दे, एक अनोखा प्रवास घडवणारा 72 मैल एक प्रवास असू दे की, वधुवर संशोधनावर आधारित सनई चौघडे असू दे. राजीवच्या कुठल्याही चित्रपटात हा गुणविशेष दिसतो.

अनेकांना ठाऊक नसेल की, इंजिनीयरिंगचा पदवीधारक असलेला राजीव महाविद्यालयात असल्यापासून नाटयकलेशी संबंधित होता. महाविद्यालयात असताना तो एकांकिका करत असे. नाशिकमध्ये असताना त्याने प्रयोग परिवार ही संस्था स्थापन केली होती. ही संस्था नाशिकच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशात होणा-या महोत्सवातून नाटयविषयक आविष्कार सादर करत असे. या संस्थेने नाशिकमध्ये सलग तीन वर्षे समकालिन नाटयमहोत्सव आयोजित केला होता.

या संस्थेच्या माध्यमातून राजीवने नाशिकमध्ये अनेक तरुण रंगकर्मीना व्यासपीठ मिळवून दिले होते. त्यावेळी राजीवने श्याम मनोहर, दिलीप पुरुषोत्तम चित्रे आणि मनोहर शहाणे यांची अनेक नाटके दिग्दर्शित केली होती. साधारणपणे 15 वर्षापूर्वी राजीव मुंबईत आला आणि त्याने चंद्रकांत कुलकर्णीचा सहाय्यक म्हणून काम करायला सुरुवात केली. बनगरवाडी चित्रपटाच्यावेळी कुलकर्णी यांच्याबरोबर त्याने काम केले होते. त्यानंतर त्याने बेधुंद मनाच्या लहरी या छोटया पडद्यावरील मालिकेचे सहदिग्दर्शन आणि लेखन केले होते.

2004 मध्ये आलेला सावरखेड एक गाव हा त्याचा पहिला चित्रपट ख-या अर्थाने तरुणाईचे पडद्यावरील प्रतिबिंब होता. जोगवाने राजीवला राष्ट्रीय प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर आलेल्या पांगिरा आणि 72 मैल एक प्रवास या चित्रपटांनी एक वास्तववादी आणि प्रयोगशील दिग्दर्शक ही त्याची ओळख ठळक केली. वेगळया धाटणीच्या आणखी काही चित्रपटांचे काम करत असतानाच तो काळाच्या पडद्याआड जावा, ही गोष्ट मराठी चित्रपटसृष्टीसाठी खरेच दुर्दैवी ठरावी.