जगन मोहन रेड्डी यांनी केली मोदींची स्तुती

हैदराबाद – भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना अनपेक्षितपणे एक नवा प्रशंसक मिळाला आहे. आंध्र प्रदेशातील वायएसआर कॉंग्रेसचे नेते माजी खासदार जगन मोहन रेड्डी यांनी मोदी यांची स्तुती केली आहे. एक कुशल प्रशासक म्हणून आपल्याला नरेंद्र मोदी आवडतात, असे रेड्डी यांनी म्हटले आहे. श्री. रेड्डी यांना नुकतेच चंचलगुडा कारागृहातून सोडण्यात आले आहे. सुमारे तीन महिन्याच्या कारावासानंतर ते प्रथमच बाहेर पडले आहेत. बाहेर पडल्यानंतर पहिल्याच मुलाखतीत त्यांनी मोदींचा विषय उपस्थित केला.

नरेंद्र मोदी यांनी सगळ्या सेक्युलर पक्षांना एकत्र आणले पाहिजे असे जगन मोहन म्हणाले. त्यांनी तेलुगू देसम पक्षावर कठोर टीका केली. मी सेक्युलर आहे, सेक्युलर राहणार आहे. चंद्राबाबू नायडू यांच्याप्रमाणे मी रंग बदलणार नाही, असेही त्यांनी प्रतिपादन केले.

कारागृहातल्या आपल्या प्रदीर्घ मुक्कामाची त्यांनी चर्चा केली. आपल्याविरुद्ध करण्यात आलेला हा कट होता आणि कसलाही गुन्हा सिद्ध झाला नसताना जामीन नाकारून आपल्याला सोळा दिवस विनाकारण तुरुंगात ठेवण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला.

कॉंग्रेस पक्षाने आंध्र प्रदेशाचे विभाजन करून केवळ प्रदेशाचेच नव्हे तर माणसांचेही विभाजन केले आहे, असे जगन मोहन रेड्डी यांनी खेदाने नमूद केले.

Leave a Comment