काँग्रेस खासदार रशिद मसुद याना चार वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली – भ्रष्टाचार केला तर कधी ना कधी बाहेर येतोच, असे म्हणण्याची वेळ आली आहे. नुकतेच राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना न्यायालयाने चारा घोटाळ्यात दोषी ठरविले. तोच लगेच दुसर्‍याच दिवशी आणखी एका मोठ्या नेत्याला भ्रष्टाचार प्रकरणी शिक्षा झाली आहे.

काँग्रेसचे राज्यसभा सदस्य रशिद मसूद यांना वैद्यकीय भरती घोटाळा प्रकरणी चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या एका कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे आता त्यांचे खासदार पद हे गोत्यात आले आहे. माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या कार्यकाळात मसूद आरोग्य मंत्री होते. तेव्हा एम.बी.बी.एस. भरतीत घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

या प्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले असून चार वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मसूद सध्या काँग्रेसचे राज्यसभा सदस्य आहेत. सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशानुसार दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास खासदार व आमदारांचे पद रद्द केले जावे असे निर्देश आहेत. त्यानुसार मसूद यांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द होऊ शकते.

मसूद काँग्रेसचे खासदार असल्यामुळे विरोधीपक्ष भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून पुन्हा एकदा काँग्रेसला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. याच यादीत आणखीही काही बडे नेते आहेत, त्यांचाही नंबर लवकरच लागणार अशी चिन्हे आहेत.

Leave a Comment