मुस्लिम तरुणांना ताब्यात घेताना काळजी घ्या- शिंदे

नवी दिल्ली- दहशतवादाच्या नावाखाली निष्पाप मुस्लिम तरुणांना चुकीने पद्धतीने ताब्यात घेतले जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना केले आहे. गृहमंत्रालयाकडून देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून हे आवाहन करण्यात आले.

कायद्याची अंमलबजावणी करणा-या एजन्सीकडून निष्पाप मुस्लिम तरुणांचा छळ करण्यात येत असल्याचे अनेक तक्रारी केंद्राकडे आल्या असल्याचे शिंदे यांनी या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे अनेक अल्पसंख्यांक तरुणांच्या मनामध्ये आपल्याला लक्ष करण्यात येत असल्याचे आणि आपल्या मूलभूत अधिकारांपासून आपल्याला वंचित ठेवण्यात येत असल्याची भावना निर्माण होत आहे.

कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी केंद्र सरकार बांधिल असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जर एखाद्या पोलिस अधिका-याने दृष्ट हेतूने, चुकीने कोणत्याही अल्पसंख्यांक व्यक्तीला अटक केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे ही शिदे यांनी म्हटले आहे.

देशाच्या विविध भागातून मुस्लिम तरुणांना दहशतवादाच्या नावाखाली चुकीने अटक करत असल्याचे अल्पसंख्यांक कामकाज मंत्री के. रेहमान खान यांनी शिंदे यांना पत्र लिहून कळवले होते. तसेच या प्रकरणासाठी जलद गती न्यायालयाची स्थापना करण्याची मागणी त्यांनी केली होती. यावर गृहमत्र्यांनी त्यांना या प्रकरणाची दखल घेण्यात येईल असे पत्र पाठवले होते.

दहशतवादासंदर्भातील प्रकरणांसाठी उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने विशेष न्यायालयांची स्थापना करावी, यासाठी विशेष वकिलांची नियुक्ती करून प्रलंबित प्रकरणामध्ये या प्रकरणांना प्राधान्य देण्यात यावे असे शिंदे यांनी पत्राद्वारे राज्य सरकारांना सांगितले. तसेच जातीय व सामाजिक ऐक्य अबाधित ठेवताना कायद्याची अंमलबजावणी करणा-या संस्थानी शून्य दहशतवादासाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले.