केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहून निरपराध मुस्लीम तरुणांना दहशतवादाच्या आरोपाखाली अटक करू नये अशी सूचना केली आहे. त्यामुळे मुस्लीम समाजात चांगली भावना निर्माण होईल परंतु भारतीय जनता पार्टीला त्यातून नवेच अस्त्र हाती लागेल. कॉंग्रेस पक्ष हा मुस्लिमांच्या मतांसाठी त्यांचा अनुनय करतो असा आरोप सातत्यानेहोत असतो. किंबहुना अनुनय हे कॉंग्रेसचे भांडवल आहे आणि त्याचा प्रचार करून हिंदू वोट बँक मजबूत करणे हे भाजपाचे साधन आहे. तेव्हा भाजपाला आता हा प्रचार अधिक तीव्र करण्याची संधीच मिळणार आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या या सूचनेमागे मुस्लीम समाजाची मर्जी राखण्याचा प्रयत्न आहे ही गोष्ट खरी आहे. गेल्या काही दिवसांपासून निरपराध मुस्लीम तरुणांना अटक केली जाते. अशा तक्रारी आलेल्या आहेत. या समाजाशी संबंधित असलेल्या एका वृत्तवाहिनीवर तर सातत्याने यावर चर्चा सुरू असते. असे एका समाजाला लक्ष करून त्या समाजातल्या तरुणांनाच विनाकारण अटक होत असते असे वातावरण तयार झाले तर ती गोष्ट सरकारसाठी हिताची ठरणार नाही. कॉंग्रेससाठी तर ती नक्कीच नाही. कारण मुस्लीम मतदार हा कॉंग्रेसचा मोठा आधार आहे.
निरपराध तरुणांवर अपराधी राजकारण
निरपराध तरुण हा मुस्लीम समाजाचा असो की हिंदू समाजाचा असो त्याला अटक करता कामा नये हा तर साधा नियम आहे. निरपराध असल्यास कोणालाच अटक करण्याची काही गरज नाही. तशी ती नसते आणि ते गृहित आहे. ते वेगळे सांगण्याची काही गरज नाही. कोणाही निरपराध तरुणाला अटक करूच नये. म्हणून शिंदे यांनी मुस्लीम समाजातल्या निरपराध तरुणांना अटक करू नये असा जातीचा उल्लेख करून आदेश द्यायला नको होता. त्यांच्याकडे आलेल्या तक्रारी मुस्लीम समाजाकडून आल्या असल्या तरी त्यावरून सूचना देताना त्यांनी मुस्लीम शब्दाचा उल्लेख केला आणि तो विनाकारण वादग्रस्त ठरला आहे. समाजात निरपराधांना अटक करण्याचे प्रमाण वाढलेच असेल तर ती चिंतेची बाब आहे आणि तशी अटक होऊ नये अशी सूचना केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्यांना पाठविली तर त्यात काही चूक नाही. परंतु तशी ती पाठवताना कोणाही निरपराध तरुणांना अटक होऊ नये असे म्हटले असते तरीही काम भागले असते. परंतु त्यांनी सुध्दा या सूचनेकडे मुस्लीम समाजाला खूष करण्याची एक संधी म्हणून पाहिले आणि तिथेच भाजपाला टीकेची संधी मिळाली.
निरपराध मुस्लीम तरुणांना अटक करू नये याचा अर्थ निरपराध हिंदू तरुणांना अटक करायला काही हरकत नाही असा होतो का असा बोचरा सवाल भाजपाच्या नेत्यांनी विचारला आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांना राज्यांकडे ही सूचना पाठवताना भाजपाकडून ही प्रतिक्रिया उमटणार हे माहीतसुध्दा होते कारण शेवटी राजकारणामध्ये असे सवाल जवाब होतच असतात. या सगळ्या गोष्टीतच राजकारण होत असते पण सत्य काय आहे याचाही तलास करायला हवा. उगाच कोणीतरी आपल्या मताच्या स्वार्थासाठी समाजात विनाकारण अस्वस्थता निर्माण केली असे व्हायला नको. खरोखरच मुस्लीम समाजातल्या अशा निरपराध मुलांना अटक होत आहे का? याची वस्तुस्थिती काय आहे याचा वस्तुनिष्ठ तपास झालाच पाहिजे. देशात अशा किती मुस्लिम समाजाच्या तरुणांना अटक झाली आहे ? की काही लोक आपल्या स्वार्थासाठी तसा प्रचार करीत आहेत याचाही तपास करायला हवा. उगाच साप साप म्हणून भुई थोपटण्याचा तर हा प्रयत्न नाही ना? याची खातरजमा करायला हवी. मालेगावच्या स्फोटाच्या प्रकरणात अशा नऊ मुस्लिम तरुणांना अटक करण्यात आली होती. शरद पवार यांनीच ही माहिती एका कार्यक्रमात दिली.
पवारांनी या तरुणांना विनाकारण अटक करण्यात आले होते अशी केवळ माहितीच दिली असे नाही तर असा सवालही केला होता की, असा अन्याय झाल्यावर यातल्या काही तरुणांना देशाच्या विरोधात काही करण्याची बुद्धी झाली तर त्यात त्यांना काही दोष देता येईल का ? पवार साहेबांनी या निमित्ताने मुस्लिम समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण खरे तर या तरुणांना पवारांच्या पक्षाच्या हातात असलेल्या गृहखात्यानेच अटक केली होती. कदाचित शिंदे यांच्या या सूचनेच्या मागे पवारांच्या या राजकारणाचीही प्रेरणा असू शकते. पवार महाराष्ट्रातल्या मुस्लिमांची सहानुभूती मिळवण्याचा असा प्रयत्न करीत असतील तर कॉंग्रेसनेही तसा तो केला पाहिजे असा काही विचार करूनही शिंदे यांनी ही सूचना पाठवली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत अटक होणारे तरुण कदाचित बरबाद होत असतील पण त्यांच्या नावाने राजकारण मात्र जोरदार सुरू आहे