काश्मीर दर्शन – गुलमर्ग

gulmarg

गुलमर्गचे श्रीनगरपासूनचे अंतर अवघे साठ किलोमीटरच असले तरी तिथेपर्यंत पोहोचायला अडीच ते तीन तास लागतात. प्रथम लागते टंगमर्ग. त्यानंतर १२ किमीवर गुलमर्गचे पठार. संपूर्ण घाटरस्ता. चोहोबाजूंनी सोबत करणारी हिमशिखरे, हिरवीगार कुरणे. गुलमर्ग हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. पाकिस्तान सीमारेषेजवळचे हे ठिकाण हिवाळी खेळांचे मुख्य आकर्षण. ऐन हिवाळ्यात बर्फांच्या उंच पर्वतरांगांवरून घसरत येण्याच्या स्कीइंगचा आनंद उपभोगायला परदेशी पर्यटकांची मोठीच गर्दी येथे होते. पण गुलमर्ग म्हणजे कोणत्याही मोसमात भेट देण्याचे ठिकाण. जुलै ऑगस्टच्या दिवसांत या डोंगरांच्या अंगावर असंख्य रानफुले फुललेली असतात. जणू फुलांची घाटीच.

gulmarg

(फोटो सौजन्य – TravelTriangle)
एप्रिलमध्येही येथे भरपूर थंडी होतीच आणि हॉटेलच्या दारातली बर्फाची भिंतही अजून उभीच होती. गुलमर्गमध्ये येण्याचे मुख्य कारण म्हणजे गोंडोला. समुद्रसपाटीपासून ८८२५ फूट उंचीवरचे हे ठिकाण. गोंडोला केबल कारमधून येथून दोन टप्प्यात थेट १३ ते १५ हजार फुटांची उंची गाठता येते.जगातील सर्वात अधिक उंचीवरील ही केबलकार. एका तासात ६०० लोकांची ने-आण करणारी. आबालवृद्ध सर्वांनाच अनोखा अनुभव देणारी ही केबलकार अनुभवायलाच हवी. आसपासचा परिसर डोळ्यात साठवत कधी १० हजार फुटांवर आपण पोहोचतो ते समजतही नाही. हा पहिला टप्पा. ज्यांना अजून पुढे जायचे त्यांनी पुन्हा तिकीट काढायचे. दुसरा टप्पा जवळजवळ १४ हजार फुटांवर नेतो. चोहोकडे शुभ्र बर्फ. पहिल्या टप्प्यावर स्लेजिंग, स्किइंग करण्याच्या अनेक सोयी. उंचावरून वेगाने खाली येताना येणारी मजा कांही औरच.
gulmarg2
गुलमर्गहून परतताना परतीच्या रस्त्यात द्रंग व्हॅलीचे दर्शन. टंगमर्ग हा गुलमर्गवरून वाहणारा सुंदर प्रवाह. ट्रऊट मासे येथे पाहायला मिळतात. रॉक क्लायबिंगसाठीही प्रसिद्ध. येथे घोडेसवारीही करता येते.
gulmarg1
गुलमर्गहून परत श्रीनगरला यायचे आणि दुसर्‍या दिवशी सोनमर्गला जायचे. तीन साडेतीन तासांचा रस्ता. दोन्ही बाजूंनी बर्फांच्या जणू भिंतीच.त्यातून मार्ग काढलेला. सोनमर्गचा अर्थ आहे सोन्याचे कुरण. ऑटमच्या दिवसांत येथील गवत सोनेरी रंगाचे दिसते म्हणून हे नांव. सोनमर्ग हेही पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. तीन हजार मीटर म्हणजे साधारण १० हजार फूट उंचीवरचे हे गांव. येथे जाताना काश्मीर कंट्रीसाईडचे दर्शन सुखावह असेच. काश्मीर व्हॅलीतील मोठी साठ मैल लांबीची नदी सिंध नल्लाह नावाने ओळखली जाते. ही सिंधूची उपनदी. लांबच लांब पसरलेली हिरवीगार कुरणे, निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर मनाला मोहिनी घालणारी हिमशिखरे. येथेही घोडेसवारी, स्कीइंग करता येते. बहुतेक पर्यटक सकाळी लवकर निघून सोनमर्ग भेट आवरून रात्री श्रीनगरला परततात.

Leave a Comment