
बीड – 2014 च्या निवडणुकांनंतर शिवसेना- भाजप युतीला सत्ता मिळाली तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करवून त्यांच्यावर खटले चालवू, असा राणा भीमदेवी इशारा भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी दिला आहे.
बीड – 2014 च्या निवडणुकांनंतर शिवसेना- भाजप युतीला सत्ता मिळाली तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करवून त्यांच्यावर खटले चालवू, असा राणा भीमदेवी इशारा भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करण्याची गोपीनाथ मुंडे यांची ही काही पहिलीच वेळ नाही. अलीकडे धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीने फोडल्यापासून तर गोपीनाथ मुंडे यांच्या टीकेला नवी धार आली आहे. आज पहिल्यादाच गोपीनाथ मुंडे यांनी अजित पवाराना जेलची हवा खाण्यासाठी पाठवू असा इशारा दिला आहे. शेतकरी नेते आणि माजी आमदार पाशा पटेल यांनी आयोजित केलेल्या शेतकरी पदयात्रेत सहभागी झाल्यावर गोपीनाथ मुंडे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अजित पवार यांनी बीड जिल्हा बँकेवर सूडबुद्धीने कारवाई केली, जो न्याय बीड जिल्हा बँकेला लावला तो राज्य सहकारी शिखर बँकेला का लावला जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यातील सर्वाधिक गाजलेला सिंचन घोटाळा आणि शिखर बँकेचे गैरव्यवहार या, या भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणात अजित पवार यांच्यावर खटला चालवून त्यांना अटक करण्याचं आश्वासनही मुंडे यांनी पदयात्रेतील शेतकर्यांना दिले.
पवारांनी मला नेस्तनाबूत करण्यासाठी यथाशक्ती सर्व प्रयत्न केले, कलसीही कसर सोडली नाही, मात्र मी त्या दोघांही पवारांना पुरून उरलो आहे, असा दावा त्यांनी केला.
मी स्वतःहून कधीही पवारांवर टीका किंवा अनाठायी आरोप करत नाही, मात्र त्यांनीच माझ्याच मतदारसंघात येऊन माझ्याविरूद्ध कारवाया करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या भ्रष्टाचारी सत्तेला आव्हान देणं गरजेचं बनलंय.
रिझर्व बँकेने प्रशासक नेमल्यावरच एरवी प्रचंड तोट्यात असलेली शिखर बँक कशीकाय फायद्यात येते, असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला. केंद्रातील पवार आणि राज्यातील पवार यांच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळेच राज्यातल्या शेतकर्यांची वाताहात झाली असल्याचा आरोप त्यांनी केला.