२९ सप्टेंबर हा दिवस सार्या जगातच हृदयविकार दिन म्हणून पाळला जात आहे. हृदयविकार हा प्राधान्याने पुरुषांनाच होतो हा एक गैरसमज आहे. महिलांना तो होत नसतो, त्यामुळे महिलांनी त्याबाबतीत काही काळजी घ्यायची गरज नाही. पुरुषांना मात्र तो होत असल्यामुळे महिलांनी आपल्या नवर्यांची काळजी घ्यावी असे सांगितले जाते. महिलांच्या शरीरामध्ये त्यांच्या प्रजननक्षम वयात एस्ट्रोजिन हे हार्मोन मोठ्या प्रमाणावर तयार होत असते आणि हे हार्मोन हृदय विकाराला प्रतिबंध करणारे असल्यामुळे महिलांना हृदय विकार होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे काहीसे समजण्याकडे लोकांचा कल आहे.
महिलांमध्ये हृदयविकार वाढतोय्
केवळ लोकांचाच नव्हे तर डॉक्टर मंडळींचाही तसाच समज आहे. परंतु नव्याने करण्यात आलेल्या पाहणीमध्ये महिलांमध्ये हृदय विकार तर असतोच, पण तोे वाढत चालला आहे असे आढळून आलेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात केलेल्या पाहणीमध्ये असे दिसून आले आहे की, जगात दरसाल ८६ लाख महिला नव्याने हृदय विकाराला बळी पडतात आणि अशा महिलांत भारतीय महिलांची संख्या मोठी आहे. दरसाल नव्याने हृदयरोग होणार्या या महिलांमध्ये ३४ टक्के महिला भारतीय असतात. महिला आणि पुरुष अशा दोघांचाही एकत्र विचार करून जेव्हा आकडेवारी काढली गेली तेव्हा असे दिसून आले की, सर्वसाधारणपणे हृदय विकाराने मरणार्यांची संख्या कमी होत चालली आहे.
गेल्या दहा वर्षात या रोगाने मरणार्यांचे प्रमाण ३० टक्क्यांनी घटले आहे. सर्वसाधारण प्रमाण घटले असले तरी महिलांमध्ये मात्र हे प्रमाण वाढत आहे आणि महिलांची वेगळी संख्या मोजली तर महिला अधिक प्रमाणात हृदय विकाराला बळी पडत असल्याचे दिसले आहे. महिलांना हृदय विकार होतच नसतो या गैरसमजामुळे महिला त्याबाबतीत जागरूक राहिलेल्या नाहीत आणि या संबंधात बेसावध राहिल्यामुळे त्यांच्यात मरण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सर्वसाधारणपणे शारीरिक हालचाली आणि व्यायाम यांचे प्रमाण सर्वत्रच कमी झालेले आहे. परंतु महिलांमध्ये व्यायामाचे प्रमाण नगण्य असते.
