पेशावरमध्ये कार बॉम्बस्फोट; 36 ठार तर 70 जखमी

पेशावर – पाकिस्तानमधील पेशावर शहरात आज सकाळी एका कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 36 जण ठार, तर 70 जण जखमी झाले आहेत. पेशावर शहरातील किस्सा खवानी बाजारपेठेतील पोलिस ठाण्याजवळच हा स्फोट झाला. रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने हा स्फोट घडविल्याची शक्यता आहे.

स्फोटातील जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.स्फोटानंतर आजूबाजूच्या आठ दुकानांना आग लागली. तसेच काही गाड्याही जळून खाक झाल्या आहेत.

गेल्या रविवारपासून पाकिस्तानमध्ये झालेला हा तिसरा मोठा स्फोट आहे.पेशावरमधील एका चर्चबाहेर झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमध्ये 80 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शुक्रवारी शासकीय कर्मचार्‍यांना घेऊन जाणार्‍या बसमध्ये स्फोट झाला होता. त्यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला होता.