सिंधुदुर्गातलं मॉरिशस

scuba

मनात इच्छा असो की नसो जे जे चांगलं आहे ते डोळयांनी सहज दिसतं.. वाईट दिसूनही त्याकडे डोळे दुर्लक्ष करतात. तसचं मनाचं आहे. मनात इच्छा असेल तर पर्यटन हमखास होतं.. अर्थात त्यासाठी स्वत:च्या खिशातले पैसे मोजण्याची तयारी हवी. खरंतर आपल्या महाराष्ट्रात सिंधुदुर्ग हा असा जिल्हा आहे की, त्यात पर्यटनाचे सारे काही घटक एकत्रीत झाले आहेत. सुंदर स्वच्छ समुद्र किनारे, जैवविविधता, नदी, नाले, समुद्र, सागरी किल्ले, ऐतिहासिक पार्श्वभूमी संत संस्कृतीची परंपरा या शिवाय स्वच्छ पर्यावरण. पर्यटकांना अपेक्षित असणारा हॉटेलिंगचा समृध्द साठाही ! सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाची वैशिष्टय़े समोर असलेली माहिती वाचत असताना मनात विविध विचार सुरु होते. जागतिक पर्यटन दिनाचा कार्यक्रम आटोपला. ऑफीस मध्ये फारसं काम नव्हतं.. गाडी काढली आणि निघालो. दौर्‍यावर असतांना एकाच दौर्‍यात अनेक घटक डोळ्यासमोर ठेवून मगच दौरा करावा असा सल्ला एका मित्राने दिला होता. तोच ग्राह्य धरुन गाडी पळत होती.
sindhudurg1
सावंतवाडी, तारकर्ली, आंबोली, वेंगुर्ला, मालवण ही नेहमीची पर्यटकांना आकर्षित करणारी ठिकाणं आहेत. यापेक्षा अधिक काय पहाता येईल. हा विचार सुरु असतानाच लक्ष्मीकांत वेंगुर्लेकर यांनी सांगितलं “साहेब तुम्हाला सिंधुदुर्गातलं मॉरिशस’ बघायचं का ? नेतो तिथं !” मी तात्काळ हो म्हणालो. गाडी गर्द हिरव्या नागमोडी वळणावरुन धावत होती. सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाल्याने रस्त्यात थोडे खड्डे झाले होते. पुळणं लागलं.. गाडी कडेला पार्क झाली. समोर विशाल सागराचं दर्शन झालं. अप्रतिम असा प्रदुषण विरहीत, स्वच्छ समुद्र किनारा कसा असतो हे प्रथम पहायला मिळालं. स्वच्छ आणि पांढरी शुभ्र वाळू ही या किनार्‍याची वैशिष्ट्य म्हणता येतील. निवतीचा आणि लागून असलेला भोगवे परिसरातला समुद्र किनारा माझ्यासाठी वेगळाच संदेश देतांना दिसत होता. स्थानिक लोकांनी फेरी बोट सुरु केली होती. त्या फेरी बोटीची चौकशी केली आणि त्यात बसलो. झुंडीने फिरणार्‍या डॉल्फिनचं दर्शन हा माझ्यासाठी एक वेगळाच आनंद होता. या फेरीत आपण एकटेच आल्याचं दु:ख मात्र होत होतं. अशा पर्यटनासाठी मुलांसोबत असणं आवश्यक असतं, हे मला समुद्रात आत गेल्यानंतर उमजलं.. दरम्यान काळे ढग भरुन आले. मी किनारा गाठला.
sindhudurg
पर्यटन जिल्हा असणार्‍या सिंधुदुर्गात काय नाही ? गड किल्ले आहेत, साहसी पर्यटन आहे, समुद्र किनारा आहे. हाऊस बोटींपासून अत्याधूनिक असे स्नॉर्कलिंग देखील ! पर्यटन जिल्हा म्हणून शासनाने मोठय़ा प्रमाणावर सेवा सुविधा देऊ केल्या आहेत. सिंधुदुर्गात फिरतांना निसर्गा सोबतच ऐतिहासिक अशा अनेक ठिकाणचा आनंद घेता येतो. प्रसिध्द मंदिरांची मोठी संख्या, धबधबे, थंड हवेचे ठिकाण आंबोली, घाटरस्ते, तलाव, संतपुरुषांचे मठ, ऐतिहासिक महत्वाची स्थळे, लोककला ज्यात दशावतार, चित्रकथी, कळसुत्री बाहुल्या, धनगरी चपई नृत्य, पांगुळ बैल, खेळे, गोफनृत्य अशी मोठी यादी सांगता येईल. हस्तकलेत लाकडी वस्तुंसाठी सावंतवाडी सारखे सुंदर गांव, अशा अनेक पर्यंटन स्थळांचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासन मदतीचा हात सतत देत आला आहे.

आगामी वर्ष हे पर्यटन वर्ष म्हणून घोषीत केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज झाला आहे. गाडी धावत होती. सागरेश्वर, सागरतीर्थ, मोचेमाड, वायंगणी, निवती, भोगवे, कालवी बंदर, केळूस, कोंडूरा या किनार्‍यावरुन फिरतांना मनस्वी आनंद मिळत होता. या जिल्ह्याचे प्रशासकीय घटक असल्याचा सार्थ अभिमान मनात ठेवून गाडी परतीच्या दिशेने वळवली.

 

1 thought on “सिंधुदुर्गातलं मॉरिशस”

  1. नम्रता धुमाळ

    किती सुंदर लेख आहे…please keep posting these marathi lekh and news

Leave a Comment