सूचनांकडे दूर्लक्ष केल्याने इमारत कोसळली

मुंबई- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच बाबू गेनू मार्केटसह या कामगार वसाहतींची पाहणी केली होती. डॉकयार्ड येथील महापालिकेच्या बाजार विभागाच्या कामगार वसाहतीची दुरवस्था झाल्यामुळे तिची त्वरित दुरुस्ती व्हावी अशा सूचना त्यांगनी पाहणीनंतर देऊनही सत्ताधारी पक्षाच्या महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांनी याची दखल न घेतल्यामुळे इमारतीची दुरुस्ती झालीच नाही. बाबू गेनू मार्केटची ही इमारत शुक्रवारी सकाळी कोसळल्याने आतापर्यंत २५ जणांना प्राण गमावावे लागले आहेत.

बाबू गेनू मार्केटला लागूनच या कामगार वसाहतीच्या इमारती असून, त्यांचे बांधकाम १९८०मध्ये झाले होते. त्यानंतर १९८३मध्ये या इमारतींचा ताबा महापालिकेच्या कामगार कर्मचा-यांना देण्यात आला. त्यात बाजार विभागाचे चतुर्थ आणि तृतीय श्रेणीतील कर्मचा-यांना घरे देण्यात आली. २८ कुटुंबे या इमारतीत होती. त्यांपैकी ६ घरे बंद होती. २२ घरांमध्ये कुटुंब राहत होते. मागील काही वर्षापूर्वी ही इमारत धोकादायक म्हणून महापालिकेने जाहीर करताना नोंद केली. त्यानुसार इमारतीचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ही करण्यात आले होते. त्यात ही इमारत दुरुस्ती करण्यालायक असल्याचे म्हटले होते.

धोकादायक बाबू गेनू मंडई आणि त्यागतच्या इमारतींबाबत स्थानिक शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव यांनी उद्धव ठाकरेंसह पाहणी केली होती. त्या वेळी मंडईसह या इमारतींचीही त्वरित दुरुस्ती करण्याची सूचना उद्धव ठाकरेंनी केली होती, अशी माहिती खुद्द यशवंत जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मात्र आजतागायत या इमारतींची दुरुस्ती झाली नाही. वेळेवेर दुरूस्ती झाली असती तर आज बाबू गेनू मार्केटची ही इमारत कोसळली नसती. व नाहक २५ जणांना प्राण गमावावे लागले नसते. केवळ महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळेच ही घटना घडली आहे.