विजयाने मुंबई इंडियन्सचे आव्हान कायम

जयपूर – चॅम्पियन्स लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेतील आव्हान मुंबई इंडियन्सने हायवेल्ड लायन्सवर सात गड्यांनी विजय मिळवत कायम ठेवले. प्रथम फलंदाजी करताना लायन्सने ५ बाद १४० धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १८.३ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.

नाणेफेक जिंकून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. रोहितचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थकी लावला. दक्षिण आफ्रिकेच्या लायन्स टीमने पाच गड्यांच्या मोबदल्यात ८१ धावा काढल्या होत्या. त्यानंतर एल्विरो पीटरसन (३५) आणि डिवाइन प्रिटोरियस (३१) यांनी नाबाद खेळी करून संघाचा डाव सावरला. गोलंदाजीत प्रज्ञान ओझाने २६ धावा देऊन दोन विकेट घेतल्या. मिशेल जॉन्सन, ऋषी धवन आणि हरभजनने प्रत्येकी एक गडी बाद केला.

सामनावीर ड्वेन स्मिथ व केरोन पोलार्डने अभेद्य ५१ धावांची भागीदारी करून मुंबईला विजय मिळवून दिला. स्मिथने ४७ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांसह ६३ धावा काढल्या. पोलार्डने २० चेंडूंत दोन चौकार व तीन षटकार ठोकून ३२ धावा काढल्या.