मध्य प्रदेशात कॉंग्रेसच्या २२ सभा होणार

भोपाळ – आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मध्य प्रदेशातल्या कॉंग्रेसने २३ ऑक्टोबरपर्यंत २२ जाहीर सभा आणि ६ रोड शोज् आयोजित करण्याचे ठरवले आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, दिग्विजयसिंग, कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे इत्यादी नेत्यांच्या या सभा असतील. सोनिया गांधी दोन सभांमध्ये भाषणे करतील तर राहुल गांधी तीन सभांना संबोधित करतील.

या सभा बेतुल, रायसेन, जबलपूर, देवास, नरसिंगपूर येथे प्रामुख्याने होतील तर छत्तरपूर, खजुराहो, उज्जैन, इंदूर, होशंगाबाद आणि भोपाल या ठिकाणी रोड शोज् होतील. मध्य प्रदेशातील भाजपाची सत्ता हिसकावून घ्यायचीच अशा निर्धाराने कॉंग्रेसचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या सभांमध्ये आणि रोड शोज् मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा भ्रष्टाचार उघड करण्याचा त्यांचा मनोदय आहे.

मध्य प्रदेशात कॉंग्रेसच्या हाती सत्ता आली तर ज्योतिरादित्य शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती दिली जाईल, अशी शक्यता एका ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्याने व्यक्त केली आहे. २००४ साली भाजपाच्या हातात सत्ता आली आणि भाजपाने दुसर्‍यांदाही निवडणूक लढवून आता सत्तेची दहा वर्षे पूर्ण केली आहेत. दिग्विजयसिंग यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसला या राज्यातली सत्ता प्राप्त करणे शक्य होईल की नाही याबाबत शंकाकुशंका असल्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या रुपाने नवा चेहरा समोर आणावा, असा विचार कॉंग्रेसमध्ये सुरू आहे.

Leave a Comment