रेल्वेच्या तक्रारी ऑन लाईन

railwayपुणे, – रेल्वे विभाग हा दररोज काही कोटी लोकांची वाहतूक करत असतो. त्यामुळे जनतेच्या तक्रारी असणे शक्य असते. अशा तक्रारी कोठूनही ऑन लाईन शक्य असतात. त्याच प्रमाणे त्या तक्रारीची नोंद घेण्यासाठी प्रत्येक स्थानकावर तक्रार पुस्तिका असते. टोलफ्री क्रमांकावरही रेल्वे प्रशासनाला कळविणे प्रवाशांना शक्य होणार आहे. त्याकरीता रेल्वे स्थानकावर ठिकठिकाणी टोल फ्री क्रमांकाचे फलक लावण्यात येणार आहेत अशी माहिती प्रवासी सुविधा समितीचे चलवादी नारायणस्वामी यांनी पुण्यात दिली.

पुणे रेल्वे स्थानकाची पाहणी करण्याकरीता नारायणस्वामी आणि समितीचे पदाधिकारी आज आले होते. यावेळी एस.चॅटर्जी, राघवेंद्र प्रताप सिंह, आलम खान, पुणे विभागप्रमुख सुनीत शर्मा, डॉ.अलोक बडकुल, ए.बी.मेंढेकर, सुनील कामठान आदी उपस्थित होते. पुणे रेल्वे स्थानकावरील विश्रामगृह, बुकिंग कार्यालय, तिकीट कार्यालय, खाण्याचे स्टॉल, सीसीटिव्ही कंट्रोल रुमची पाहणी केली.

नारायणस्वामी म्हणाले, प्रवाशांच्या मनात अनेक सूचना आणि तक्रारी असतात. त्यामुळे प्रवाशांनी 1800-111-321 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. त्याचप्रमाणे भारतीय रेल्वेच्या संकेस्थळावरही ऑनलाईन तक्रारी करता येणार आहेत. प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्थानकावर स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे स्वच्छतेबाबतच्या सूचना संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या आहेत. उत्सवांकरीता प्रशासनातर्फे विशेष रेल्वे सोडण्यात येतात. यावर्षीही तशी योजना आखण्यात येत आहे. तसेच समितीला पाहणी दरम्यान बसण्याच्या सुविधेत कमतरता दिसून आली. त्यामुळे सहा प्लॅटफॉर्मवरील बसण्याची सुविधा वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. सध्या पुणे रेल्वे स्थानकावर 895 प्रवाशांकरीता सुविधा आहे. त्यामध्ये गरजेप्रमाणे वाढ करण्यात यावी, असे समितीने सुचविले आहे.

समिती देशभर दौरा करणार
प्रवसी सुविधा समितीची स्थापना ऑगष्ट महिन्यात झाली असून दिल्ली आणि कर्नाटकातील काही स्थानकांना समितीने यापुर्वी भेट दिली आहे. कर्नाटकमध्ये सीसीटिव्ही आणि स्कॅनर बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. डिसेंबर 2013 पर्यंत देशातील सर्व राज्यांमध्ये समिती भेट देणार आहे. दरम्यान प्रत्येक महिन्याला कमिटी अहवाल पाठविणार आहे. तसेच शेवटी संपूर्ण दौ-याचा अहवाल करुन रेल्वे मंत्रालयाला पाठविण्यात येईल असे नारायणस्वामी यांनी सांगितले.

Leave a Comment