वजन कमी करणे गुडघ्यासाठी फायद्याचे

न्यूयॉर्क – वयाची पन्नाशी उलटली की, लोकांचे गुघडे दुखायला लागतात. गुडघ्याचे अनेक विकार आहेत. परंतु या सर्व विकारांवर वजनाचा परिणाम होत असतो. लोकांनी नियमित व्यायाम केला आणि वजन नियंत्रणात ठेवले तर कसलेही औषधपाणी न करता गुडघ्याचे अनेक विकार आपोआप कमी व्हायला लागतात. म्हणून वजन कमी करणे हे मधुमेहाबरोबरच गुडघ्याच्या विकारांसाठीही आवश्यक असते.

डॉक्टर मंडळी सर्वांनाच नेहमीच वजन कमी करण्याचा सल्ला देत असतात आणि तो सल्ला मधुमेहींसाठी असतो. पण सर्वांनाच काही मधुमेह होत नाही. मधुमेह होणारे लोक कमी असतात. त्या मानाने गुडघे दुखीचा आणि संधीवाताचा त्रास होणार्‍यांची संख्या प्रचंड असते. किंबहुना वृद्धत्वाकडे वाटचाल करणारी प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी गुडघे दुखीच्या विकाराला बळी पडण्याची शक्यता असतेच.

आपल्या शरीराचे वजन वाढले की, आपलेच वजन आपल्याला पेलावे लागते. हे पेलण्याचे काम गुडघ्यावरच येऊन पडते. आपण पायावर उभे रहात असलो आणि पायाने चालत असलो तरी पायाच्या अन्य अवयवांपेक्षा गुडघ्यावर जास्त भार पडत असतो. त्यामुळे वाढते वजन म्हणजे गुडघे दुखीला निमंत्रण असते. ते टाळण्यासाठी वजन कमी करणे हा रामबाण उपाय होय.