मनोहर जोशींची ‘मातोश्री’ वारी फेल

मुंबई- दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात पोस्टरबाजीचे वॉर चांगलेच रंगले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी या मतदारसंघातून इच्छूक असताना अचानक स्थायीचे सभापती राहुल शेवाळे यांचे पोस्टर उमेदवार म्हणून झळकत असल्याने मनोहर जोशी संतप्त झाले होते. त्यांनी शेवाळेंची तक्रार ‘मातोश्री’ वर नेली होती, त्यांची ही वारी फेल ठरली असून त्यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे शेवाळे यांच्या पोस्टरबाजीला ‘मातोश्री’चाच आशीर्वाद असल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून शिवसेना २२ तर भाजप २६ जागावर निवडणूक लढवणार असल्याचे ठरले आहे.

दक्षिण-मध्य मुंबईतून निवडणुक लढण्यासाठी मनोहर जोशी उत्सुक असताना अचानक या मतदारसंघात मुंबई महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांचे पोस्टर व बॅनर्स झळकू लागले. गणेशोत्सव मंडळातील त्यांच्या भेटीगाठी वाढल्याची खबर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना लागल्यावर ते अस्वस्थ झाले होते. त्यावमुळे जाशी यांनी मातोश्रीवर जावून उध्दव ठाकरे यांची भेट घेतली मात्र त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून शिवसेना २२ तर भाजप २६ जागावर निवडणूक लढवणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेत हा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते. रिपब्लिकन पक्षाला जागा देण्याबाबत दस-यानंतर चर्चा करण्यात येणार आहे. दसरा झाल्यानंतर रिपाइंल जागा देण्याबाबत विचार करण्यासाठी दुसरी बैठक होणार असल्याचे समजते. त्यासोबतच महायुतीत आगामी काळात राजू शेटीची स्वाभिमान संघटना, जनसुराज्य पक्ष व जयंत पाटील यांचा शेतकरी कामगार पक्ष यांना सामावून घेण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.