इस्लामाबाद – दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानातील पेशावरमध्ये झालेल्या एका चर्चवरील हल्ल्यानंतर आता तिथल्या अल्पसंख्यक शीख समुदायाच्या गुरुद्वार्यांवर हल्ले होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तालिबान अतिरेकी ख्रिश्चनांच्या पाठोपाठ शिखांना आणि त्यांच्या धर्मस्थळांना लक्ष्य करतील, असा इशारा पाकिस्तानच्या गृहखात्याने दिला आहे.
पाकिस्तानात गुरुद्वार्यांवर हल्ले शक्य
गृहखात्याने देशातल्या सर्व राज्यांना सूचना पाठवल्या असून त्या त्या राज्यातील गृहमंत्र्यांनी शिखांना संरक्षण द्यावे आणि त्यांच्या धर्मस्थळांचे संरक्षण करण्याची तरतूद करावी, असे कळवले आहे. पंजाब परगण्याच्या गृहमंत्र्यांनी या सूचनेची गांभीर्याने दखल घेतली असून लाहोर विभागाच्या आयुक्तांना पंजाब प्रांतातील गुरुद्वार्यांना संरक्षण देण्याचा आदेश दिला आहे. पाकिस्तानातील गुरुद्वार्यांपैकी महत्वाची गुरुद्वारे पंजाब परगण्यात आहेत.
शीख समाजाच्या दृष्टीने पंजाब प्रांतातील नानकाना साहिब येथील गुरुद्वारा गुरुनानक सिंग हा गुरुद्वारा सर्वाधिक पवित्र आहे. भारतातले हजारो शीख त्याच्या दर्शनासाठी नानकाना साहिब येथे जात असतात. त्यांची ही भावना ओळखून तालिबान अतिरेकी याच गुरुद्वार्याला लक्ष्य करतील असा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे.
पोलीस तर गुरुद्वार्यांचे रक्षण करतीलच, पण देशातल्या स्वयंसेवी संघटनांनी सुद्धा याबाबत पुढाकार घ्यावा आणि आपापल्या भागातील अल्पसंख्यकांच्या धार्मिक स्थळांच्या संरक्षणात सहकार्य करावे, असे आवाहन सरकारने केले आहे.
