गर्भारपणातील धूम्रपान बाळासाठी घातक

वॉशिंग्टन – महिलांनी गरोदर असताना धूम्रपान केले तर त्याचा तिच्या पोटातल्या बाळाच्या आरोग्यावर नेमका कोणता दुष्परिणाम होतो याचा शोध घेतला असता धूम्रपान करणार्‍या मातेमुळे बाळाला दम्याचा रोग जडू शकतो असे आढळले. लहान मुलांना धूम्रपानाचा कसलाही संसर्ग झालेला नसतानाही त्यांना त्यासंबंधीचे विकार का जडतात याचा शोध घेतला असता या विकाराचे मूळ त्यांच्या आईने गरोदर अवस्थेत केलेल्या धूम्रपानात असते असे आढळले.

या संबंधात उंदरांवर आधी प्रयोग करण्यात आला. गरोदर अवस्थेतील मादीला निकोटीनचा वास दिला. सिगारेटमध्ये निकोटीन भरपूर असते. त्यामुळे या प्रयोगात निकोटीन वापरले. निकोटीनचा वास दिलेल्या उंदरीणीची पोटी जी पिली जन्माला आली त्यांच्यामध्ये दम्यासारखे श्‍वासाचे विकार असल्याचे आढळले.

लॉसएंजल्स् बायोमेडिकल इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये मूळ भारतीय असलेले विरेंद्र रेहान यांनी हे सारे प्रयोग केलेले आहेत. उंदरांच्या प्रयोगावरून त्यांनी असा निष्कर्ष काढला की, धूम्रपान करणार्‍या महिलेच्या पोटात बाळ असेल तर ते श्‍वसनाचे विकार घेऊन जन्माला येते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment