गटबाजी टाळल्यास कॉँग्रेस पुन्हा विजयी होईल- राहूल गांधी

नागपूर- आगामी काळात कॉंग्रेसचा पराभव करण्याची ताकद कोणत्याच पक्षात नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी गटबाजी टाळल्यास पक्षाला पुन्हा विजय मिळेल, असा विश्वास कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विदर्भ-मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या भेटीप्रसंगी व्यक्त‍ केला.

राहुल गांधी यांनी नागपूरजवळ सुराबर्डी येथे विदर्भ, मराठवाड्यातील जिल्हा पदाधिकारी व ब्लॉक अध्यक्षांशी संवाद साधला. या वेळी विविध जिल्ह्यांतील सुमारे २५०० पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गांधी यांच्याकडे व्यक्त केलेल्या भावनांची, तक्रारींची दखल घेण्याचे आदेश गांधी यांनी कॉँग्रेसच्या मंत्र्यांना दिले.

आगामी काळात उमेदवारी देताना जिल्हाध्यक्षापासून ब्लॉक अध्यक्षांपर्यंत सर्वानाच विश्वासात घेण्यात येईल. केंद्र सरकारने जनतेसाठी विविध योजना आणल्या आहेत. गांधी यांनी सुरक्षाविषयक सोपस्कार दूर सारत थेट कार्यकर्त्यांमध्ये मिसळून त्यांच्याशी संवाद साधला. कार्यकर्त्यांच्या तक्रारींकडे लक्ष देण्याच्या सूचनाही राहुल गांधी यांनी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांना केल्या.

राहुल गांधी बुधवारी पुण्यात येणार असून त्यांच्या स्वागतासाठी पक्षाने जय्यत तयारी केली आहे. बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात ते पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती शहर काँग्रेसचे अध्यक्ष अभय छाजेड यांनी दिली.