कॉंग्रेसशी नव्हे, सीबीआयशी लढत

भोपाळ : येणार्‍या काळात भारतात होणार्‍या निवडणुकांत भारतीय जनता पार्टीशी टक्कर देण्याची ताकद कॉंग्रेस पक्षात नाही, त्यामुळे कॉंग्रेस पक्ष सीबीआयचा वापर करीत आणि भाजपाला कॉंग्रेसशी नव्हे तर सीबीआयशी टक्कर द्यावी लागेल, अशी प्रखर टीका भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काल भोपाळ येथे बोलताना केली. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता महाकुंभ या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला मध्य प्रदेशाच्या विविध भागातले भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. त्याला भाजपाच्या बुथ पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी हजर रहावे, अशी सूचना देण्यात आली होती आणि येणार्‍या कार्यकर्त्याला दहा रुपये भरून नाव नोंदवावे लागणार होते. मध्य प्रदेश भाजपाच्या प्रचार यंत्रणेने या महाकुंभाला पाच लाख कार्यकर्ते येतील असा अंदाज बांधला होता. परंतु प्रत्यक्ष नोंदणी सुरू झाली तेव्हा साडे सात लाख कार्यकर्त्यांची नावे नोंदली गेली.

केवळ भारतातलाच नव्हे तर सार्‍या जगातला हा अशा प्रकारचा सर्वात मोठा कार्यक्रम आहे, असा दावा भाजपाच्या नेत्यांनी केला. संसदेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज या दोघांनीही, आपण आपल्या आयुष्यात एवढी मोठी सभा पाहिली नाही असे उद्गार काढले. या कार्यक्रमात उमा भारती यांचे भाषण झाले. नरेंद्र मोदी भारताला सुपरपॉवर बनवतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावर येत असल्यामुळे सर्वांच्या मनात उत्सुकता होती. अडवाणी यांनी या सभेत भाषणही केले. त्यांनी आपल्या भाषणात, भारतीय जनता पार्टीशिवाय अन्य कोणताही पक्ष एवढी संघटनात्मक ताकद निर्माण करू शकणार नाही असे प्रतिपादन केले. अडवाणी यांनी मध्य प्रदेशाचे मुख्य मंत्री शिवराजसिंह चौहान आणि नरेंद्र मोदी या दोघांचेही पुष्पगुच्छ स्वीकारले. नरेंद्र मोदी यांनी अडवाणींचा पदस्पर्श केला. त्याला मात्र अडवाणी यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही.

Leave a Comment