गृहमंत्र्यांच्या दबावाखाली भागवत यांना गोवले

जयपूर – अजमेर शरीफ दर्गा बॉम्बस्फोटात आरोपी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि ज्येष्ठ संघ नेते इंद्रेशकुमार यांची नावे घ्यावीत म्हणून आपल्यावर केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी प्रचंड दबाव आणला, असे पत्र या प्रकरणातील एक आरोपी भावेश पटेल यांनी या प्रकरणाचा तपास करणार्‍या विशेष न्यायालयाला पाठवले आहे. आपल्यावर असा दबाव आणणार्‍यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचाही समावेश होता, असा गौप्यस्फोट भावेश पटेल याने आपल्या या पत्रात केला आहे.

राजस्थानातील अजमेर येथील दर्ग्यात झालेल्या बॉम्बस्फोटात भावेश पटेल हा आरोपी आहे. आपल्याला या संबंधात अटक होणार याची चाहूल लागताच आपण उत्तर प्रदेशातील संभल येथील आपल्या गुरूंच्या आश्रमात गेलो. तिथे कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंग यांच्याशी आपली भेट झाली आणि त्यांनी आपल्याला हा खोटा जबाब देण्यास सांगून तसा जबाब दिल्यास निर्दोष सोडू असे आमीष दाखवले, असे भावेश पटेलने म्हटले आहे.

त्यानंतर आपल्यावर सुशीलकुमार शिंदे, गृहराज्यमंत्री आर.पी.एन. सिंह, कोळसा मंत्री प्रकाश जैस्वाल यांनी दबाव आणला आणि या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी म्हणून भागवत आणि इंद्रेशकुमार यांची नावे घेण्यास सांगितले. आपण तसा जबाब दिला, परंतु न्यायालयात मात्र दबावाखाली जबाब दिल्याचे सांगितले. त्यामुळे एन.आय.ए.चे अधिकारी चिडले आणि त्यांनी आपला तुरुंगात छळ केला, असे भावेशने पत्रात सांगितले आहे.

सध्या भावेश हा अलवरच्या तुरुंगात आहे. तिथे त्याने अधिकार्‍यांच्या छळाविरुद्ध बंड पुकारले आणि तुरुंगातच बेमुदत उपोषण सुरू केले. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. तिथून त्याने हे पत्र लिहिले असून आपण मोहनराव भागवत आणि इंद्रेशकुमार यांची नावे दबावाखाली गोवली असल्याचे कबुल केले आहे.