२६/११ हल्ल्याच्या जबाबासाठी पाकचे पथक मुंबईत

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा खटला पाकिस्तानातही सुरू आहे. याचसंबंधी आणखी काही जबाब नोंदविण्यासाठी पाकिस्तानचे एक न्यायालयीन पथक नुकतेच मुंबईत दाखल झाले आहे. पाकिस्तानच्या या पथकात आठ जणांचा समावेश असून हे पथक जबाब नोंदवून घेण्याचे काम करीत आहे. पाकिस्तानच्या या न्यायालयीन पथकाचा हा भारत दौरा अतिमहत्त्वाचा मानला जात आहे.

यावेळी पाकचे न्यायालयीन पथक कसाबचा कबुलीजबाब घेणारे किला कोर्टातील न्यायाधीश, सरकारी बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचाही जबाब नोंदविणार आहे.
सोबतच २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा तपास अधिकारी, क्राईम ब्रान्चचे अधिकारी रमेश महाले, कसाबवर उपचार करणारे जे.जे.हॉस्पीटलचे दोन डॉक्टर तसेच कसाब अल्पवयीन नव्हता, हे तपासून सांगणारे डॉक्टर या सर्वांचा जबाब नोंदविण्याची जबाबदारी या पथकावर सोपवण्यात आली असल्याचे समजते.

हे जबाब पाकिस्तानात सुरू असलेल्या न्यायालयीन खटल्यासंदर्भात वापरण्यात येणार असल्या चे समजते. त्यामुळेच अगोदर, कसाब पाकिस्तानी नागरिक नव्हताच, असा दावा करणा-या पाकिस्तानच्या या न्यायालयीन पथकाचा हा भारत दौरा येणा-या काळात अतिमहत्त्वाचा मानला जातो आहे.

Leave a Comment