रालो आघाडी पुनरुज्जीवित होईल

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आता विस्कळीत झाली असली तरी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर या आघाडीत काही पक्ष सहभागी होतील आणि तिचे पुनरुज्जीवन होईल, असा विश्‍वास भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. काल तेलुगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी नवी दिल्लीत येऊन भाजपाच्या अध्यक्षांची भेट घेतली आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कॉंग्रेसचा पराभव करणे हे आपले पहिले काम असेल, असे प्रतिपादन केले.

त्यामुळे तेलुगू देसम हा भाजपाचा जुना मित्रपक्ष रालो आघाडीमध्ये येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केलेल्या या आशेला महत्व आले आहे. चंद्राबाबू नायडू हे १९९६ आणि १९९८ अशा दोन वर्षी राष्ट्रीय राजकारणात महत्वाची भूमिका बजावत होते. १९९६ साली तिसर्‍या आघाडीतील पक्षांची जमवाजमव करून त्यांनी युनायटेड फ्रंट ही आघाडी संघटित केली होती. त्यानंतर १९९८ साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आपल्या ३४ खासदारांचा बाहेरून पाठिंबा देऊन या सरकारचे स्थैर्य वाढवले होते.

चंद्राबाबू नायडू यांच्या या राजकारणामुळे त्यांच्या दिल्लीतल्या हालचालींना महत्व आले आहे. मात्र त्यांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीविषयी काही प्रमाणात कटुता आहे, परंतु कॉंग्रेसविरोधी राजकारणामुळे त्यांना पुन्हा एकदा भाजपाच्या जवळ जावे लागेल असे बोलले जात आहे. भारतीय जनता पार्टी प्रणित रालो आघाडीमध्ये पूर्वी १८ पक्ष होते. परंतु आता शिवसेना आणि अकाली दल हे दोनच पक्ष या आघाडीत राहिले आहेत.

Leave a Comment