नवी दिल्ली – मतदार सर्वेक्षणांवर सरसकट बंदी आणली जाणार नाही, अशी ग्वाही विधी आणि न्यायमंत्री कपिल सिबल यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. सध्या चार राज्यातील निवडणुकांच्या निमित्ताने अशी सर्वेक्षणे प्रसिद्ध होत असून त्यामधून कॉंग्रेस पक्षाचा दारूण पराभव होणार असे दिसून येत आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे सरकार या सर्वेक्षणावर बंदी घालणार, अशा चर्चा देशात सुरू झाल्या आहेत. मात्र श्री. कपिल सिबल यांनी ही शक्यता फेटाळून लावली.
विरोधी पक्षांशी चर्चा केल्याशिवाय या संबंधात केंद्र सरकार कसलाही निर्णय घेणार नाही, असे श्री. सिबल म्हणाले. सध्या आपल्या देशात निवडणुकीच्या काळात सर्वेक्षणे प्रसिद्ध करायला बंदी आहे. मतदान झाल्यानंतर अशा सर्वेक्षणांचे निष्कर्ष जाहीर करता येतात. मात्र एखाद्या निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यापासून सर्वेक्षणांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यावर बंदी असते. या काळामध्ये सर्वेक्षणांना बंदी घालण्याचा अधिकार सरकारला आहे. मात्र सरसकट अशी बंदी घालणे सरकारला शक्य नाही.