पेट्रोलच्या वापरात दुचाक्या आघाडीवर

नवी दिल्ली – केंद्र सरकारने पेट्रोल बचतीचा एक उपाय म्हणून पेट्रोल आणि डिझेलच्या वापराचे सर्वेक्षण केले असता उपलब्ध पेट्रोलपैकी ६२ टक्के पेट्रोल दुचाकी वाहनांमधून सामान्य माणसांकडून वापरले जाते, असे आढळून आले. सरकार पेट्रोलला श्रीमंतांचे इंधन समजते आणि ती श्रीमंतांची असल्यामुळे त्याला सबसिडी देत नाही. परंतु या सर्वेक्षणातून पेट्रोल हे श्रीमंतांचे इंधन नसून सामान्य माणसांचे इंधन असल्याचे दिसून आले आहे. उपलब्ध पेट्रोलच्या २७ टक्के पेट्रोल मोटारकारमध्ये तर ६ टक्के पेट्रोल तीन चाकी वाहनांत वापरले जाते.

डिझेल हे गरिबांचे इंधन असले तरी ते आता श्रीमंतांकडून सुद्धा वापरले जात आहे. कारण पेट्रोल महाग असल्यामुळे लोक डिझेलवर चालणार्‍या मोटारकार वापरायला लागले आहेत आणि मोटारकारचे मालक डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणावर करायला लागले आहेत. या पाहणीमध्ये असे आढळून आले आहे की, एकूण डिझेल वापराच्या १९ टक्के डिझेल मोटारकारमध्ये वापरले जात आहे.

भारतात दरवर्षी पेट्रोल आणि डिझेलचा वापर वाढत चालला आहे आणि हे सारे पेट्रोल, डिझेल परदेशातून आयात केले जात असल्यामुळे त्यावर आपल्या परदेशी चलनातील गंगाजळीतून मोठ्या प्रमाणावर डॉलर्स खर्च करावे लागतात. हे डॉलर्स वाचविण्यासाठी पेट्रोल आयात कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दरवर्षी आपल्या देशामध्ये ३ लाख ९७ हजार कोटी रुपयांचे इंधन तेल आयात केले जाते. त्यावर सरकार सबसिडी देते, ती १ लाख ८० हजार कोटी रुपयांची असते. इंधन तेलाच्या वापरात काटकसर केल्याशिवाय हे खर्च कमी होणार नाही हे सरकारच्या लक्षात आले आहे.