रांची – दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही काही दिवसांतच पुन्हा या क्रूर घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. झारखंडच्या खूंटी-रांची रोडवर एका बसमध्ये एका बालिकेवर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. आरोपी बबन खान या 40 वर्षीय गृहस्थाला अटक करण्यात आली आहे.
झारखंडमध्ये चालत्या बसमध्ये बालिकेवर बलात्कार
तो रांचीच्या बुंडू भागात राहणारा आहे. लोकांनीच पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी केवळ छेडछाडीची तक्रार दाखल केली असली तरी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलीवर बलात्कार झाला आहे. यानंतर डीआइजी शीतल उराव यांनी मेडिकल रिपोर्टनुसार कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.
जेएच 01 झेड 4773 या नंबरची बस चाईबासाकडून रांचीकडे निघाली होती. खूंटी बसस्टँडवर आपल्या घराकडे निघालेली एक अल्पवयीन मुलगी आणखी काही मुला – मुलींसोबत बसमध्ये चढली होती. पीडित मुलगी केवळ सात वर्षांची आहे. एका प्रवाशाने या मुलीला आपल्या मांडीवर बसवले. इतर मुले इकडे- तिकडे बसली. काही वेळातच बसमधील प्रवाशांची संख्या कमी झाली. त्यानंतर या गृहस्थाने या मुलीला मागच्या सीटवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
हुटारमध्ये उतरल्यानंतर या मुलीने आपल्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी तातडीनं बसचा पाठलाग करून बस थांबविली आणि आरोपीला पकडले आणि बेदम चोप दिला. यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पीडित मुलगी अजुनही दहशतीखाली आहे. आरोपीला आणि बसला ताब्यात घेतले आहे. यासंबंधी बसच्या कंडक्टरचीदेखील चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
