अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या भलतीच निराश आहे. मोठा गाजावाजा करत प्रदर्शित करण्यात आलेल्या जंजीर चित्रपटाला मिळालेल्या अपयशामुळे बिचारी दु:खी झाली आहे. बिग बी अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीला खर्या अर्थाने गती देणार्या जंजीरच्या रिमेकचे बॉक्स ऑफिसवर एवढे वाईट हाल होतील, याची कल्पनाही कुणी केली नव्हती. अमिताभ बच्चन यांच्या याआधी रिमेक केलेल्या डॉन आणि अग्निपथ या चित्रपटांप्रमाणेच जंजीरही प्रेक्षकांना आकर्षित करेल, असा प्रियंकाला पूर्ण विश्वास वाटत होता. मात्र असे होऊ न शकल्याने तिचा चांगलाच भ्रमनिरास झाला. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाची दाणादाण उडाली. दुसरीकडे जंजीरसोबतच प्रदर्शित झालेल्या प्रियंकाची चुलत बहीण परिणिती चोप्राच्या शुद्ध देसी रोमान्सने मात्र मोठी कमाल करत बाजी मारली.
शुद्ध देसी रोमान्ससमोर प्रियंकाचा जंजीर अगदीच पुचाट ठरला. या दोन्ही बहिणींचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याने त्यांच्या कामगिरीकडे सगळय़ांचेच लक्ष लागले. या शर्यतीत परिणितीच सरस ठरली. अर्थात एका अयपशामुळे खचून जाणार्यांपैकी प्रियंका नाही. निराशा, दु:ख मागे सारून पुढे वाटचाल करणे हेच जीवन असल्याचे ती सांगते. जंजीरचे अपयश विसरून आता तिने कृष-३ आणि गुंडे या आगामी चित्रपटांवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रियंकाच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाचे यश आणि अपयश कलाकारांच्या बाबतीत ऊन-सावलीप्रमाणे असते. जंजीरच्या वाट्याला आलेल्या दारुण अपयशामुळे तिने एक धडा नक्कीच घेतला आहे. तो म्हणजे वर्षाला फक्त एकच चित्रपट करणे कधी कधी धोक्याचे ठरू शकते. त्यास यश न मिळाल्यास मोठा फटका बसतो. त्यामुळे हातात नेहमीच चार-पाच चित्रपट असावेत, असे सूत्र तिने स्वीकारले आहे.