राजस्थानचे मंत्री फरार

जयपूर – बलात्काराचा आरोप आल्यामुळे राजीनामा दिलेले राजस्थानचे माजी मंत्री बाबुलाल नागर यांनी गुन्हे अन्वेषण खात्याच्या पोलिसांना गुंगारा देऊन पलायन केले आहे. पोलिसांनी गेल्या आठवड्यापासून त्यांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यासाठी त्यांना आपल्या कार्यालयात बोलावले आहे. परंतु काही ना काही कारणे सांगून ते पोलिसांना चकवत आहेत. काल पोलीस त्यांच्या घरी गेले, परंतु ते घरी सापडले नाहीत. त्यांच्या मुलाने ते शिर्डीला गेले असल्याचे सांगितले. परंतु ते परत कधी येतील हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

त्यांचा मुलगा रवि याने आपले वडील फरार असल्याच्या बातमीचा इन्कार केला. ते रक्ताचे नमुने देण्यास टाळाटाळ करत नाहीत आणि त्यासाठी कधीही उपलब्ध असतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. परंतु पोलिसांनी मात्र ते टाळाटाळ करत असल्याचे म्हटले आहे.

गेल्या ११ तारखेला त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी ३५ वर्षे वयाच्या एका महिलेला नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला असा तिचा आरोप आहे. या संबंधात पोलिसात फिर्याद दाखल होताच मुख्यमंत्र्यांनी नागर यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला. या प्रकरणाची तपासणी आता सीबीआयकडून होणार आहे.