जगनमोहन रेड्डी जामिनावर मुक्त

नवी दिल्ली – आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचे चिरंजीव माजी खासदार जगनमोहन रेड्डी यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायाधीश यु. दुर्गाप्रसाद राव यांनी रेड्डी यांना दोन लाख रुपयांच्या जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला. बेहिशोबी मालमत्ता गैरमार्गाने जमा केल्याच्या प्रकरणात जगनमोहन रेड्डी यांच्यावर सीबीआयने अनेक खटले दाखल केले आहेत आणि या खटल्यांच्या संदर्भात ते सोळा महिन्यांपासून चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात खितपत पडलेले होते.

जामिनावर मुक्त झाल्यानंतर जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या अनुमतीशिवाय हैदराबाद सोडून बाहेर जाऊ नये आणि आपल्या विरोधातील साक्षीदारांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दबाव आणण्याचा कसलाही प्रयत्न करू नये, अशी तंबी न्यायाधीशांनी त्यांना दिली आहे. श्री. रेड्डी यांच्या जामिनाच्या अर्जावर बरेच दिवस कोर्टबाजी होत राहिली, मात्र शेवटी त्यांना सीबीआय न्यायालयाकडून जामीन मिळाला.

गेल्या ९ मे रोजी जगनमोहन रेड्डी यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्याचबरोबर न्यायालयाने सीबीआयला चार महिन्याच्या आत तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्याचाही आदेश दिला. त्यानुसार त्यांच्यावर १० आरोपपत्र दाखल झाले आहेत आणि आता त्यांची जामिनावर मुक्तता झाली आहे.

जगनमोहन रेड्डी यांची जामिनावर मुक्तता होणार असल्याची बातमी समजताच त्यांच्या समर्थकांनी मिठाई वाटून आणि फटाके उडवून आनंद साजरा केला. श्री. रेड्डी हे निर्दोष असून त्यांचा न्यायालयावर विश्‍वास आहे आणि ते या खटल्यातून निर्दोष बाहेर पडतील असा विश्‍वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment