चंद्राबाबू नायडू रालो आघाडीत येण्याची शक्यता

नवी दिल्ली – तेलुगू देशम पक्षाचे नेते आणि आंध्राचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अचानकपणे दिल्लीत येऊन भाजपा अध्यक्ष राजनाथसिंह यांची भेट घेण्यामुळे राजकारणात अनेक चर्चांना ऊत आला असतानाच श्री. नायडू यांनी कॉंग्रेसवर कठोर शब्दात टीका केली आहे. त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देशम पक्ष भारतीय जनता पार्टी प्रणित रालो आघाडीमध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पत्रकारांशी बोलताना चंद्राबाबू नायडू यांनीही भाजपाला पाठींबा देण्याच्या शक्यतेचा इन्कार केला नाही. कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली देशात अनेक प्रकारचे पेचप्रसंग निर्माण झाले आहेत, असे उद्गार त्यांनी काढले. भारतीय जनता पार्टीला पाठींबा देण्याबाबत आपण आताच काही निश्‍चितपणे बोलणार नाही, कारण आंध्र प्रदेशातल्या आपल्यासारख्या नेत्याला राजकारणाची चर्चा करण्यासाठी ही वेळ योग्य वाटत नाही, असे ते म्हणाले.

कॉंग्रेस पक्षामुळे आंध्र प्रदेशात तर मोठाच गोंधळ उडाला आहे. आपण आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री असताना अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण आंध्र प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला गती दिली होती. परंतु सध्या देशामध्ये अर्थव्यवस्था कोलमडली आहे. रस्ते नाहीत, रोजगार नाही. अशा प्रसंगी तेलुगू देशम पक्षाने नेहमीच सकारात्मक राजकारण केलेले आहे आणि आपण पुन्हा तसेच राजकारण करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment