इशरत जहाँ चकमक प्रकरणी गुजरातच्या कायदामंत्र्यांची चौकशी

अहमदाबाद -गुजरातमधील गाजलेल्या इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी गुजरातचे कायदामंत्री प्रदीपसिंह जडेजा यांची सोमवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशी केली. तसेच सीबीआयने गुजरातचे मंत्री भुपेंद्रसिंह चुडामास, माजी मंत्री प्रफुल पटेल व वकील कमल त्रिवेदी यांना हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली आहे. यामुळे बनावट चकमकप्रकरणी मोदी अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इशरत जहाँ चकमक प्रकरणी सीबीआयने जडेजा यांची गांधीनगर येथे चौकशी केली. या प्रकरणाच्या तपासामध्ये अडथळे आणण्यासाठी जडेजा यांनी नोव्हेंबर 2011 मध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या बैठकीमध्ये नऊ जण उपस्थित होते. या बैठकीला उपस्थित असलेले निलंबित आयपीएस अधिकारी जी. एल. सिंघल यांच्या चौकशीत या बैठकीतील संवादाचे रेकॉर्डिग सीबीआयला सापडले होते.

त्याच्या आधारे जडेजा यांची चौकशी करण्यात आली. तसेच गुजरातच्या अन्य दोन मंत्र्यांना चौकशीसाठी बोलवल्याने मोदींचा पाय अधिकच खोलात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिंघल यांच्याविरोधात 90 दिवसांमध्ये आरोपपत्र सादर करण्यास सीबीआयला अपयश आल्याने सध्या सिंघल जामीनावर बाहेर आहेत. मागील आठवडया मध्ये सीबीआयने मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे सचिव मुरमु यांची व गुन्हे शाखेचे सहआयुक्त ए.के. शर्मा यांची चौकशी केली होती. दरम्यान, वंझारा यांनी चकमक घडवून आणलेल्या पोलिसांच्या पाठिशी गुजरात सरकार खंबीरपणे उभे राहिले नसल्याचा आरोप मोदींवर केला होता.