फरार अतिरेकी अफजल उस्मानीचा शोध लागेना 20 पथकांची नियुक्ती

मुंबई – येथील मोक्का न्यायालयात शुक्रवारी पोलिसांच्या हाती तुरी देऊन फरार झालेला इंडियन मुजाहिदीनचा अतिरेकी अफजल उस्मानी याचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे त्याच्या शोध प्रक्रियेला वेग आला असून, त्यासाठी 20 पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही पथके सर्वत्र अफजलचा शोध घेत आहेत. अफजल कितीही दडून बसला, तरी तो निश्चितच पोलिसांच्या हाती लागेल, असा विश्वास पोलिस सूत्रांनी व्यक्त केला.

गुजरातमधील अहमदाबाद आणि सुरत स्फोटांत हात असलेला इंडियन मुजाहिदीनचा अतिरेकी अफजल उस्मानी याला शुक्रवारी दुपारी दक्षिण मुंबईतील सत्र न्यायालय परिसरात हजर केले होते. त्यावेळी अफजल पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. तथापि, काल त्याचा सुगावा लागू शकला नाही. त्यानंतर त्याच्या शोधासाठी एकूण 20 पथकांची स्थापना केली. ही पथके बसस्थानक, रेल्वे स्टेशन, टॅक्सी, ऑटोसह महानगरातील सर्व हॉटेल, लॉजमधून त्याचा शोध घेत आहेत. या शोध मोहिमेसाठी मुंबई पोलिसांच्या 12 झोनमधील 20 पोलिसांची पथके गठित केली आहेत. ठिकठिकाणी अफजल उस्मानीचे छायाचित्रे जारी केली आहेत.

2008 मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अफजल उस्मानी मूळ उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. त्यामुळे पोलिस मुंबईमधून बाहेर जाणा-या मार्गांवर नाकाबंदी करून त्याचा शोध घेत आहेत. मात्र, अद्याप अफजल सापडू शकला नाही. मात्र, त्याला शोधण्यात पोलिस निश्चितच यशस्वी ठरतील, असे मुंबई पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment