आंध्र प्रदेशातले वाय एस आर कॉंग्रेसचे नेते आणि माजी खासदार जगन मोहन रेड्डी यांची जामिनावर मुक्तता झाली असल्याने आंध्रातल्या राजकारणाला नवे वळण लागणार आहे. जगन मोहन रेड्डी हे कॉंग्रेसला महागात पडले आहेत पण आता हे दिसणार आहे की ते तुरुंगात राहून अधिक त्रासदायक ठरतात की बाहेर येऊन जास्त त्रासदायक ठरतात? त्यांनी आपल्या वडिलांच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पदाचा गैरवापर करून बेसुुमार संपत्ती जमा केली असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यावरून सीबीआयने त्यांची चौकशी केली असून त्यांच्यावर अनेक खटले भरले आहेत. त्यांनी जमा केलेली संपत्ती त्यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. अशी संपत्ती जमा केली की कोणाला तरी संशय येणारच आणि त्याची चौकशी होणारच असा काही नियम नाही कारण तसे असते तर सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांंचीही सीबीआय कडून चौकशी व्हायला हवी होती पण जगन मोहन आणि रॉबर्ट वड्रा या दोघांचीही प्रकरणे सारखीच असताना जगन मोहन यांची चौकशी होते, त्यांना अटक होते आणि त्यांना राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न केला जातो पण रॉबर्ट वड्रा यांना हातही लावला जात नाही. तेव्हा यातल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा महत्त्वाचा नाही तर चौकशीच्या बाबतीत केल्या जाणार्या भेदभावाचा मुद्दा महत्त्वाचा आहे.
जगन मोहन बाहेर
जगन मोहन रेड्डी यांनी आपल्या वडिलांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री पदावर आपला हक्क सांगितला. सोनिया गांधी यांनी तो नाकारला. जगन मोहन यांनी सोनिया गांधी यांचे ऐकले असते तर त्यांच्यावर सोनिया गांधी यांनी सीबीआयला असे सोडले नसते आणि जगन मोहन रेड्डी हे कॉंग्रेसच्या मंत्रिमंडळात सुखाने नांदले असते. पण त्यांनीही मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला आणि संकट ओढवून घेतले. कॉंग्रेस पक्षात घराणेशाही काही नवी नाही. सोनिया गांधी यांच्या बाबतीत तरी ती नवी नाही. गांधी घराण्याचंी पाचवी पिढी लायकी नसताना सत्तापदावर बसत आहे. मग हीच परंपरा रेड्डी घराण्याला का लागू नसावी असा जगन मोहन यांचा सवाल होता. त्यात त्यांच्या दृष्टीने काही चूक नव्हती पण सोनिया गांधी यांनीही जगन मोहन यांंना नकार देऊन एक नवा शत्रू निर्माण केला. आंध्रात दुसरा कोणी समर्थ नेता असता आणि त्याच्यासाठी जगन मोहन रेड्डी यांना नाकारले असते तर ते मानता आले असते पण आंध्रात तसा नेताही नाही पण सोनिया गांधी यांना जगन मोहन यांना का दुखावले हे त्यांनाच माहीत.
असे दुखावल्यानंतर जगन मोहन यांनीही आपण कसे लोकप्रिय आहोत हे सोनिया गांधी यांना दाखवून देण्याचे ठरवले. मग या दोघांत जो संघर्ष निर्माण झाला त्यातून जगन मोहन यांची सीबीआय चौकशी सुरू झाली आणि त्यांना आता बसावे लागले. या सर्व प्रकारात सोनिया गांधी यांनी आंध्रातली कॉंग्रेस मात्र संपवली. आता तिथले राजकारण फार गुंतागुंतीचे झाले आहे. कारण जगन मोहन रेड्डी यांच्या या प्रकरणाला तेलंगणाच्या राजकारणाची फोडणी मिळाली आहे. जगन मोहन रेड्डी हा या राजकारणातला एक मोठा घटक होऊन बसला आहे कारण त्यांनी आपला प्रभाव दाखवून दिला आहे. तो प्रभाव सहन न होऊन सोनिया गांधी यांनी त्यांना तुरुंगात पाठवण्याची सोय केली पण त्यांना तुरुंगात टाकले तरी त्यांची लोकप्रियता कमी होण्याऐवजी ती वाढली असल्याचेच दिसून आले. जगन मोहन यांनी तुरुंगात राहून काही पोट निवडणुका लढवल्या आणि त्यांत कॉंग्रेसला धूळ चारली. आता सोनिया गांधी यांना प्रश्न पडला आहे की तुरुंगातले जगन मोहन आपल्याला महागात पडतात की बाहेर पडलेले महागात पडतात ?
कदाचित जगन मोहन आत असोत की बाहेर असोत पण ते कॉंग्रेसला महागच पडणार आहेत. रेड्डी यांना धडा शिकवण्याचा कॉंग्रेसचा विचार असला तरी तो धडा कॉंगे्रसलाच मिळत आहे कारण जगन मोहन यांच्या सोबत काही कॉंग्रेस नेत्यांनाही खटल्यात गोवण्यात आले आहे. शेवटी त्यांनी केलेला भ्रष्टाचार वडिलांच्या कार्यकाळात केला आहे आणि त्यांचे वडील हे कॉंग्रेसचेच मुख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री कॉंग्रेसचेच होते. जगन मोहन यांंच्या भ्रष्टाचारात कॉंग्रेसच्याच मंत्र्यांचा हात होता. आता जगन मोहन विरोधी खटल्यात कॉंग्रेसचे काही मंंत्रीही आरोपी आहेत. सोनिया गांधी यांनी जगन मोहन यांचा सूड घेण्याचा बेत आखला पण तो त्यांच्यावरच उलटला आहे. कॉंग्रेसचे आंध्रातले सारे राजकारणच नासले आहे. आता जगन मोहन रेड्डी बाहेर पडले आहेत ते या राजकारणाला अजून कसे कसे वळण लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. हे सारे घडत असतानाच माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत येऊन भाजपा नेत्यांच्या गाठी भेटी घ्यायला सुरूवात केली आहे. त्यांच्या आगामी हालचालींवरही जगन मोहन यांच्या हालचाली अवलंबून राहणार आहेत. आंध्राचे राजकारण रंगायला लागले आहे.