एडसचे निर्मुलन २०३० पर्यंत शक्य - Majha Paper

एडसचे निर्मुलन २०३० पर्यंत शक्य

aids
पनामा सिटी – येत्या १५ वर्षात म्हणजे इसवी सन २०३० पर्यंत जगातून एडसचे निर्मुलन करणे शक्य होईल असा विश्‍वास संयुक्त राष्ट्र संघटनेच्या एडस् विषयक कक्षाचे प्रमुख लुईस लोर्स यांनी व्यक्त केले आहे. एडस्वर लस शोधण्याचे प्रयत्न जारी आहेत आणि या प्रयत्नांची गती पाहिली असता आपण पुढच्या १५ वर्षात मानवतेला या व्याधीपासून मुक्त करू शकू अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

पनामा सिटी येथे या संबंधात बोलावण्यात आलेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जगात अजूनही एडस्चे रुग्ण आहेत परंतु त्याची साथ राहिलेली नाही आणि मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दिशेने मानवतेची पावले पडलेली आहेत. असे लोर्स यांनी खात्रीने सांगितले. जगात दरवर्षी ३० लाख लोक एडस्बाधित होतात आणि या व्याधीचे स्वरूप गंभीर होत होत त्यातले १७ लाख लोक मृत्युुमुखी पडतात अशीही माहिती त्यांनी दिली.

२० वर्षांपूर्वी एडस्च्या रुग्णावर उपचार करण्याचा खर्च १९ हजार डॉलर्स होता. तो आता १५० डॉलर्सपर्यंत खाली आला आहे. जेनेरिक औषधे दिल्यामुळे हे होऊ शकले असे लोर्स म्हणाले. या विषयात आपण केलेली एक प्रगती म्हणजे अशा रुग्णांना ताबडतोब इलाज उपलब्ध होऊ शकतो. सध्या जगामध्ये काही विशिष्ट लैंगिक सवयी असणार्‍या लोकांनाच एडस् अधिकतर होण्याची शक्यता आहे असे ते म्हणाले. बाकी सामान्य माणसाला रक्त देण्याघेण्यातून किंवा ड्रग्स् मधून एडस् होण्याचे प्रमाण आता बरेच कमी झाले आहे. असे त्यांनी प्रतिपादन केले.

Leave a Comment