बॉलिवुडच्या हिंदी चित्रपटांमधुन मनोरंजनाच्या नावाखाली अनेकदा आक्रमकता दिसून येते. अश्या काळात खर्या अर्थानं सुखद धक्का देणारा चित्रपट रितेश बत्राने आपल्या भेटीला आणला आहे. इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयची जुगलबंदी आणि दिग्दर्शकाने केलीली कथेची नेमकी मांडणी यामुळे हा लंचबॉ़क्स एकादा चाखायलाच हवा.
द लंचबॉक्सची कथा अतिशय साधी आहे. मुंबईच्या भाऊगर्दीत एका सरकारी कार्यालयातील अकाऊन्ट डिपार्टमेंटमध्ये काम करणारा साजन फर्नांडीस (इरफान खान) आणि एक कर्तव्यदक्ष गृहिणी ईला (निर्मत कौर) यांचा काहीही संबंध नसताना अचानक जुळून आलेला संवाद आणि त्यांतून उलगडत गेलेलं त्यांचं आयुष्य. साजन हा वयाच्या उत्तरार्धाकडे झुकलेला सरकारी अधिकारी आहे. निवृत्ती स्विकारून नाशिकला स्थिरस्थावर होण्याचे बेत आखून तयार आहे. पत्नीचा अगोदरच मृत्यू झालेला. त्यामुळे आपलं बेचव आयुष्य एकाकीपणे पण न कुढता स्वत:च्या पद्धतीने जगणारा 35 वर्षांच्या काळात एकही चूक न करणारा पण, एकलकोंडा साजन लोकांच्या लेखी काही विक्षिप्त. साजन ऑफिसमधून रिटायर झाल्यानंतर त्यांच्याजागी एका नवीन कर्मचार्याची शेखची (नवाझुद्दीन सिद्दीकी) भरती केली गेलीय. त्याला ट्रेन करण्याची जबाबदारी साजनवर आहे.
दिग्दर्शक म्हणून रितेश बत्रा यांचा हा पहिलाच प्रयत्न. पण, पहिल्याच प्रयत्नात त्यांनी आपलं अस्तित्व बॉलिवूडला ठळ्ळकपणे दाखवून दिले आहे.. प्रत्येक गोष्टी सांगूनच समजावली पाहिजे असं नाही तर न सांगताही प्रेक्षकांसमोर अनेक गोष्टी मांडता येतात, हे त्यांनी या चित्रपटातून दाखवून दिलंय.
चित्रपटाच्या सुरुवातीला सुरू झालेलं ईलाची आणि साजनचं आयुष्य चित्रपट संपतानाही तसंच सुरू राहिल आहे पण आयुष्य जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र दोघांचाही बदललाय. कधी कधी चुकीची गाडीही योग्य जागेवर पोहचते, सांगत आशेचा किरण दाखवणारी कथा दमदारपणे त्यांनी प्रेक्षकांसमोर मांडली आहे. ईलाच्या वरच्या खोलीत राहणार्या देशपांडे काकू, शेखची होणारी बायको, ईलाची आई, मुलगी, नवरा हे सगळे साईड कॅरेक्टर्स’ या कथेतील वेगळा भाग मात्र अजिबात वाटत नाहीत. ही कथा सांगण्यासाठी ते तिथे हवेच आहेत, अन्यथा कथा कशी पुढे सरकणार, असं प्रेक्षकांना वाटायला लावणारे… उगाचच केली जाणारी सरमिसळ, नकोशी वाटणारी गाणी आणि म्युझिकच्या बॅकग्राऊंडवर उगाच निर्माण केला जाणारा सिरियसनेस’ यांच्या प्रेमातून हा चित्रपट पडलेला नाही.
निर्मत कौरचा हा पहिलाच चित्रपट आहे पण, प्रेक्षकांना कोणत्याही क्षणी ती आपला नवखेपणा जाणवून देत नाही. मध्यमवयीन ईला नवरा राजीव आणि मुलगी यशस्वीसोबत आपलं बेचव आयुष्य जगतेय. नवर्याची बाहेर भानगड आहे हे तिला माहित आहे. पण, तरिही त्याला आनंदी ठेवण्यासाठी तिचे नानातर्हेचे प्रयत्न सुरू आहेत. एका महिलेनं आपल्या मुलीला घेऊन बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या केल्याचं समजल्यानंतर ऑफिसमध्ये नेहमी येणार्या डब्याची वाट पाहणारा साजन किंवा, लग्न झालेल्या मुलीकडून पैसे कसे घेणार? म्हणून मुलगा हवा होता असं म्हणताना नातीला कुरवाळणारी ईलाची आई अशी प्रत्येक गोष्ट संवादांपेक्षा अधिक काहीतरी सांगताना दिसते. डब्यात मेहनत घेऊन बनविलेली गवारीची भाजी असो किंवा नुसताच रिकामा डबा प्रत्येक वस्तू काहीतरी जाणवून देण्याचा प्रयत्न करतात.
इरफान खान, नवाजुद्द्दीन सिद्दीकी यांच्या अभिनयाची अनोखी भेट या निमित्ताने आपल्याला मिळाली आहे. जिवनाच्या धावपळीत असणार्या अनेकांना आपल प्रेम हरवल आहे अस वाटत अशा लोकांनी आशुष्याकडे कस बघावा याचा संदेश देणार्या या ‘लंच बॉक्स’ चा आनंद घ्यायलाच हवा.
चित्रपट – द लन्च बॉक्स
निर्मीती – अनुराग कश्यप, गुनीत मोंगा
संगीत – मॅक्स रिचर
दिग्दर्शक – रितेश बत्रा
कलाकार – इरफान खान, निर्मत कौर, नवाझुद्दीन सिद्दीकी
रेटिंग – * * * *