उझबेकिस्तानात नागरिकांना योगाचा ध्यास

उझबेकिस्तान देशातील नागरिक भारतीय योग शास्त्राच्या प्रेमात आकंठ बुडाले असल्याचे अनुभवास येत असून येथील नागरिकांनी केवळ शारिरीक व्यायाम म्हणून नव्हे तर जीवनपद्धती म्हणून योगाचा स्वीकार केला आहे. येथे १९९५ मध्येच भारतीय सांस्कृतिक केंद्राची स्थापना करण्यात आली होती. त्याचे नांव २००५ साली लाल बहादूर शास्त्री सेंटर फॉर इंडियन कल्चर असे बदलले गेले आहे. यथे नियमित स्वरूपात योग वर्ग चालविले जातात व नांव नोंदणीसाठी केंद्राबाहेर रांगा लागल्याचेही दिसून येत आहे.

केंद्राचे संचालक राजेश मेहता म्हणाले की या देशात योग, कथक, हिंदी भाषा आणि तबला यांचे वर्ग घेतले जात असून स्थानिक लोक व सरकारने त्यांना मनापासून प्रतिसाद दिला आहे. हे वर्ग येथे मोफत घेतले जातात. योग वर्गासाठी सध्या २८२ नागरिक येत आहेत त्यात १६ ते ७० वयाच्या नागरिकांचा समावेश आहे. त्यात ८० टक्के महिला आहेत.

योगशिक्षक टी.एन मंजुनाथ म्हणाले की नियमित योग करण्यामुळे येथील नागरिकांत भारताबद्दल जिव्हाळ्याची भावना निर्माण होताना दिसत आहे. सोमवार ते शुक्रवार नियमित वर्ग होतात व शनिवारी ध्यानधारणा घेतली जाते. योगामुळे ताणतणाव नाहिसा होत असल्याचा अनुभव येथील नागरिक घेत असून कांही जण संधीवात, वजन कमी करणे, दमा घालविणे यासाठीही योग करत आहेत. विशेष म्हणजे या वर्गाना येथील विविध देशाच्या दूतावासातील अधिकारीही उपस्थिती लावताना दिसत आहेत

Leave a Comment