रासायनिक शस्त्रे नष्ट करायला वर्ष लागेल

दमास्कस – सीरियाने आपल्याकडे रासायनिक शस्त्रे असल्याची कबुली गुरुवारी प्रथमच दिली. रासायनिक शस्त्रे नष्ट करायला एक वर्षे लागणार असून त्यासाठी एक अब्ज डॉलर्स खर्च येणार आहे, असे सीरियाचे अध्यक्ष बशर-अल-असद यांनी सांगितले.

अमेरिकेच्या खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असद यांनी ही माहिती दिली. मात्र, सीरियात गेल्या महिन्यात झालेल्या रासायनिक शस्त्रांच्या हल्ल्याची जबाबदारी घेण्यास असाद यांनी नकार दिला. या हल्ल्यात हजाराहून अधिक नागरिक ठार झाले होते.

रासायनिक शस्त्र नष्ट करण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. रासायनिक शस्त्रांबाबत आंतरराष्ट्रीय नियम पाळण्याबाबत सीरिया वचनबद्ध आहे. रासायनिक शस्त्र नष्ट करण्याचा खर्च अमेरिका उचलण्यास तयार असल्यास आम्ही सगळी शस्त्र त्यांच्या हवाली करू, असेही ते म्हणाले.

दरम्यान, सीरियाने रासायनिक हल्ला करून आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग केला आहे. ही शस्त्र वापरणे हा गुन्हा आहे, असे मत संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते मार्टिन नेसिस्र्की यांनी व्यक्त केले. गेले दोन आठवडे तपास करून संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षकांनी हा अहवाल तयार केला. मात्र ही रासायनिक शस्त्रे ही बंडखोरांनी वापरली होती, याबाबतचे नवे पुरावे सीरियाने दिले आहेत. संयुक्त राष्ट्रांचा अहवाल राजकीय असून तो एकतर्फी आहे, असा आरोप रशियाचे उप परराष्ट्रमंत्री सर्जेई रायबकोव्ह यांनी दिली.