इस्लामाबाद – अबोटाबादेत घुसून अमेरिकन लष्कराने ओसामा बिन लादेनची हत्या केल्याच्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाचे जनक मानले जाणारे शास्त्रज्ञ ए.क्यू. खान यांची सुरक्षा व्यवस्था तिपटीने वाढविली गेली असल्याचे वृत्त आहे. आपल्या संशयास्पद वर्तनाने बदनाम झालेले खान यांना तालिबान्यांकडून जशा जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत तसेच ते अमेरिकेच्याही रडारवर आहेत. अमेरिकेने अनेक वेळा त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला आहे.
खान यांच्यावर गुप्तपणे अणु कार्यक्रम सुरू ठेवल्याचे आणि अन्य देशांना हे तंत्रज्ञान पुरविल्याचे आरोप असून त्याखाली ते २००४ पासून नजरकैदेत आहेत. मात्र त्यांच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पूर्वी त्यांच्या सुरक्षेसाठी दोन कर्नल रँकचे अधिकारी आणि ४० जवान होते. ही संख्या आता चार अधिकारी आणि १२० जवान अशी करण्यात आली आहे. घरातून बाहेर पडताना त्यांच्यासाठी दहा चिलखती गाड्यांचा ताफा दिला गेला असून देशाच्या पंतप्रधानानंाना प्रवासादरम्यान देण्यात येणारी सुरक्षा व खान यांना पुरविली गेलेली सुरक्षा सारखीच आहे असेही समजते.
खान यांच्या घराजवळ अमेरिकी अथवा युरोपियन नागरिकांना राहण्यास बंदी केली गेली आहे तसेच गृह मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र आणल्यानंतरच अरब नागरिक या भागात राहू शकतील. अबोटाबादेन अमेरिकन सील कमांडोनी गुप्त कारवाई करून अल कायदाचा म्होरक्या ओसामा चा खात्मा केला होता. अशीच घटना खान त्यांच्याबाबत पुन्हा घडली तर देशाच्या अब्रूचे पुन्हा धिंडवडे निघतील अशी भीती पाक सरकारने व्यक्त केली आहे.