मोदींच्या सभेसाठी भोपाळमध्येही पाच रुपये

भोपाळ – नरेंद्र मोदी यांच्या भोपाळ येथे येत्या २५ सप्टेंबरला होणार असलेल्या जाहीर सभेलासुध्दा हैदराबाद प्रमाणेच पाच रुपये शुल्क लावण्यात येणार आहे. मात्र हैदराबाद आणि भोपाळच्या शुल्कामध्ये एक फरक आहे. भोपाळमध्ये सभेला येणार्‍या मतदान केंद्र स्तरावरच्या कार्यकर्त्यांकडून पाच रुपये घेतले जाणार आहेत आणि या कार्यक्रमाला कार्यकर्ता महाकुंभ असे नाव देण्यात आले आहे. या सभेस ७ लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील असा अंदाज आहे.

या जाहीर सभेत मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे दोघेही उपस्थित राहणार आहेत. मुस्लीम मतदारांना आकृष्ट करण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांनुसार जयपूर प्रमाणेच याही मेळाव्यात ५० हजार मुस्लीम उपस्थित राहतील असे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले. ते केवळ उपस्थितच राहतील असे नाही तर लोकांना त्यांची उपस्थिती दिसावी असा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जाईल.

तशी उपस्थिती दिसावी म्हणून भारतीय जनता पार्टीने मुस्लीम समुदायाच्या पुरुषांना स्कल कॅप घालून येण्याचे आणि महिलांना बुरखा पांघरून येण्याचे आवाहन केले आहे. जयपूरमध्ये असा प्रयोग करण्यात आला होता.

Leave a Comment