लखनौ – उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागातील मुझफ्फरनगर येथे आणि त्याच्या परिसरात झालेल्या दंगलीत सहभागी असल्याच्या आरोपावरून विविध राजकीय पक्षांच्या १६ नेत्यांच्या विरोधात अजामीनपात्र पकड वॉरंट जारी करण्यात आले आहे. या लोकांना येत्या दोन दिवसांत अटक केली जाईल असे पोलीस अधिकार्यांनी सांगितले. वॉरंट जारी करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये बसपा खासदार कादीर राणा, भाजपाचे आमदार संगीत सोम तसेच भारतेंदू सिंग, बसपाचे आमदार नूर सलीम आणि मौलाना जमील, कॉंगे्रसचे नेते सईद उज्मान, भारतीय किसान युनीयनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांचा समावेश आहे.
आजवर दंगलीत सहभागी असल्याबद्दल आणि प्रक्षोभक भाषणे केल्याबद्दल दोघांना अटक करण्यात आली आहे असे या अधिकार्यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून एका वृत्तवाहिनीवर मुझफ्फनगर दंगलीचे सत्य सांगण्याच्या निमित्ताने स्टिंग ऑपरेशनवर आधारित ध्वनिफित दाखवली जात आहे. या ध्वनिफितीत पोलीस अधिकार्यांनी, आपल्याला दंगलखोरांविरुध्द कडक कारवाई न करण्याचे आदेश वरून आले होते असे म्हटल्याचे दाखवले जात आहे. हा आदेश समाजवादी पार्टीचे नेते आझमखान यांनी दिला असल्याचे मानले जाते. परंतु आझमखान यांनी या आरोपाचा इन्कार केला असून या स्टिंग ऑपरेशनच्या ध्वनिफितीमध्ये कोठेही आपला आवाज नसल्याचे स्पष्ट केले आहे.
स्टिंग ऑपरेशन करणार्या पत्रकारांनी पोलिसांना आपले नाव घेण्यास सांगितले असल्याचा आरोपही आझमखान यांनी केला. दरम्यान दिल्लीच्या जामा मशिदीचे इमाम बुखारी यांनी मुझफ्फरनगरला भेट दिली असून या दंगलीला आझमखान जबाबदार असल्याचे म्हटले आहे. मुलायमसिंग यादव यांनी आझमखान यांना पक्षातून काढून टाकावे अशी मागणी बुखारी यांनी केली आहे.