रांची – झारखंडमधील नक्षलवाद्यांनी राज्याच्या आदिवासी भागातून १० ते १६ वर्षे वयोगटातील मुलांचे अपहरण करून त्यांना आपल्या कारवायात सहभागी करून घेण्याचा सपाटा लावला आहे. अशा मुलांना पळवून नेऊन त्यांना बॉम्ब तयार करण्याचे शिक्षण देणे आणि विविध ठिकाणी बॉम्ब पेरण्यासाठी त्यांचा वापर करणे असा उद्योग नक्षलवाद्यांनी सुरू केला असल्याचे दिसून आले आहे.
अशाच एका मुलांपैकी दहा वर्षाचा परदेशी लोहरा नावाचा मुलगा बॉम्ब तयार करत असताना झालेल्या स्फोटात मरण पावला. त्याला माओवाद्यांनी लतेहार जिल्ह्यातल्या एका गावातून पळवून आणले होते. या गावातून त्यांनी आठ मुले पळविली होती. त्यातला हा मुलगा मरण पावल्यानंतर त्याचा मृतदेह त्यांनी त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केला आणि या मुलाविषयी पोलिसांना अधिक माहिती न देण्याविषयी बजावले. त्यासोबत नक्षलवाद्यांनी या पालकांना मुलाचे अंत्यविधी गडबडीत पार पाडण्यास भाग पाडले.
माओवाद्यांचा हा प्रकार गेल्या १५ वर्षापासून सुरू आहे. परंतु अशा पळवलेल्या मुलांना बॉम्ब तयार करायला लावण्याचा हा पहिलाच प्रकार असावा. अशा मुलांनी पेरलेल्या बॉम्बमुळे झारखंड राज्यात गेल्या वर्षभरात १६३ राखीव पोलिसांचे बळी गेले आहेत.