नवी दिल्ली – कांद्याचे भाव ८० रुपये किलो असे भडकलेले असतानाही कॉंग्रेसच्या नेत्यांना त्याची चिंता कशी नाही हे दाखवून देत केंद्रीय मंत्री कपिल सिबल यांनी कांद्याच्या भावाचा प्रश्न उडवून लावला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी कांद्याच्या भावाला सरकार जबाबदार नाही असे उद्गार काढले. कांदे काही सरकार नाही. कांद्याचे भाव वाढल्याबद्दल चिंता वाटत असेल तर व्यापार्यांना विचारा असे उद्गार काढले. कपिल सिबल यांच्या उद्गारामुळे कॉंग्रेस पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे.
कपिल सिबल एका बाजूला ही जबाबदारी सरकारची नसल्याचे म्हणत असले तरी तसे म्हणणे राजकीयदृष्ट्या म्हणणे परवडणारे नाही याची जाणीव कॉंग्रेसच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांना आहे. त्यामुळे कॉंग्रेस सरकारने राज्य सरकारांना तंबी दिली असून कांद्याची साठवणूक करून भाव वाढवणार्या व्यापार्यांवर कारवाई करावी असे बजावले आहे. भाकपाचे नेते डी. राजा यांनी कपिल सिबल यांचे हे उद्गार बेजबाबदारपणाचे आणि निष्काळजीपणाचे असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान दिल्लीमध्ये काल कांदा ८० रुपये प्रति किलो या भावाने विकला गेला. दिल्ली शहराला मोठ्या प्रमाणावर कांदा पुरवणार्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये कांद्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे दिल्लीला कांद्याचा पुरवठा कमी झालेला म्हणून भाव वाढले आहेत.