
टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांची अमेरिकन थिंक टँक म्हणून ओळखल्या जाणार्या कार्नेज एन्डेाव्हमेंट फॉर इंटरनॅशनल पीस संस्थेच्या बोर्डवर ट्रस्टी म्हणून नेमणूक झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष हार्वे फिममन यांनी रतन टाटा बोर्डवर आल्याबद्दल आनंद व्यक्त केला असून टाटा यांच्या निवडीचा आम्हाला अभिमान आहे असे सांगितले आहे.
हार्वे या संदर्भात बोलताना म्हणाले की रतन टाटा यांना जागतिक अर्थव्यवस्थेचे उत्तम ज्ञान आहे. त्याचबरोबर उद्योग क्षेत्र ही जगातील अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा भाग असून त्याचाही अनुभव टाटा यांच्याकडे आहे. रतन टाटा हे कार्नेज साठी अॅसेट ठरतील व त्यांच्यामुळे ग्लोबल थिक टँक विकसित होण्यास मदत होणार आहे. दिल्लीत संस्थेचे नवीन दक्षिण आशिया केंद्र स्थापन करण्यासही टाटा यांचे सहाय्य मोलाचे ठरणार आहे.
रतन टाटा यांनी टाटा सन्सचे चेअरमन म्हणून १९९१ ते २०१२ पर्यंत जबाबदारी सांभाळली आहे. टाटा ग्रुपच्या अनेक कंपन्यांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. ते पंतप्रधानांच्या व्यापार उद्योग कौन्सिलचेही सदस्य आहेत. कार्नेज एन्डोव्हमेंट फॉर इंटरनॅशनल पीस ही संस्था अमेरिकेतील सर्वात जुना थिक टँक असून त्याची स्थापना १९१० साली झाली आहे. या संशोधन केंद्राच्या मास्को, बिजिग, बैरूट आणि ब्रुसेल्स येथेही शाखा आहेत. संस्थेचे मुख्यालय वॉशिग्टन डीसी येथे आहे.