मुसोलिनीच्या मॅजिक कारची ६० लाख पौंडांना विक्री

दुसर्‍या जागतिक महायुद्धात इटलीचा हुकुमशहा मुसोलिनी याने जर्मनीचा हुकुमशहा हिटलर याच्याशी हातमिळविणी केली होती. मात्र असे असले तरी नाझी जर्मनांशी कार रेसिंग करून त्यांना हरविण्यासाठी मुसोलिनी नेहमीच प्रयत्नशील होता. या कार रेसिंगसाठी मुसोलिनीने खास लाल गडद रंगाची, बंदुकीच्या गोळीच्या आकाराची आणि सर्वाधिक वेगवान कार अल्फा रोमिओ ८-सी ३५ तयार करून घेतली होती. १९३५ सालची ही कार पुन्हा लिलावात विक्रीसाठी आली तेव्हा या मॅजिक कारला चक्क ६० लाख पौंडांची बोली मिळाली असल्याचे समजते. विशेष म्हणजे गेली कित्येक दशके वापरात नसूनही या कारने आपला १६५ मैल वेगाचा विक्रम पुन्हा नोंदविला आहे. युरोपातील दुसर्‍या क्रमाकाची महागही कार अशीही या कारची ओळख आहे.

इटालियन ग्रँड प्रिकस या स्पर्धेत ही गाडी प्रथम १९३५ साली ट्रॅकवर आली तेव्हा त्याचे व्यवस्थापन फेरारी कडे होते. त्योवळी फेरारीने स्वतःचा ब्रँड बाजारात आणला नव्हता. नाझी जर्मनी रेसिग टीमच्या स्पर्धेसाठी मुसोलिनी याने ही कार उतरविली होती. त्यावेळी या स्पर्धांसाठी हिटलर याने मर्सिडीज बेंझ व ऑडी या गाड्यांना खास सरकारी अनुदान देऊन त्या गाड्या स्पर्धेसाठी उतरविल्या होत्या. त्याला उत्तर म्हणून मुसोलिनीने ही अल्फा रोमिओ गाडी खरेदी केली होती आणि हे मॉडेल अनबिटेबल ठरले होते.

१९५५ साली ही गाडी डेनिस पूर या उद्योजकाने विकत घेतली होती व केवळ दोन मिनिटांत या गाडीने इटालियन ग्रंड प्रिक्स स्पर्धेत पाचव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर येण्याचा विक्रम केला होता. पूर याने ही गाडी डोंगर चढण्याच्या स्पर्धेतही वापरली होती. त्यानंतर चार दशके ती वापरली गेली नाही. मात्र आजही ही गाडी ताशी १६५ मैल वेगाने दुरूस्ती केल्यानंतर धावते आहे हे याचे विशेष.