मंगळावर जाणार स्नेक रोबो

नॉर्वे येथील एसआयएन टीइटी आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांच्या संयुक्त सहकार्यातून वैज्ञानिकांनी स्नेक रोबो तयार केले असून ते मंगळावर पाठविले जाणार आहेत असे समजते. मंगळावरील अडचणीच्या जागेतील नमुने गोळा करण्यासाठी या सापाप्रमाणे सरपटू शकणार्यास रोबोचा चांगला उपयोग होऊ शकणार आहे. पारंपारिक रोबोंच्या सहाय्यानेच हे रोबो मंगळावर पाठविले जाणार आहेत.

सध्या नासाच्या क्युरिओसिटी रोव्हरने मंगळावरील बरेच नमुने गोळा केले आहेत. मात्र हे रोव्हर आकाराने मोठे आहे व त्यामुळे कांही भागात ते जाऊ शकत नाही. आत्तापर्यंत नासाने चार रोव्हर मंगळावर पाठविले आहेत मात्र सहा चाकी हे रोबो सांदी सपाटीत जाऊ शकत नाहीत. नॉर्वेतील वैज्ञानिकांनी तयार केलेले स्नेक रोबो या रोव्हरचाच आर्म म्हणूनही वापरण्याचा विचार सुरू असून एखाद्या अवघड जागेतील नमुने गोळा करताना हा आर्म किवा हात सुटून बाजूलाही जाऊ शकणार आहे व पुन्हा जोडलाही जाणार आहे. सध्याचे रोव्हर मंगळावरील मातीचे नमुने तेथेच तपासून त्याचा अहवाल पृथ्वीवर पाठविते या साठी २० मिनिटांचा वेळ लागतो. मात्र स्नेक रोबोंचा वापर केला गेल्यास हा कालावधी आणखी कमी करता येऊ शकेल असा संशोधकांचा दावा आहे.