अमेरिकन गुप्तवार्ता संस्थेतील माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडेन याने अमेरिकी गुप्तहेरगिरीबद्दल प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांमुळे ब्राझीलच्या अध्यक्षा डेल्मा रौसेफ यांनी त्यांची २३ आक्टोबरची नियोजित अमेरिका भेट लांबणीवर टाकली आहे. ब्राझील सरकार आणि ओबामा प्रशासन या दोघांकडूनही ही भेट अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलली गेली असल्याचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
अमेरिकन गुप्त वार्ता विभागाने जगभरातील अनेक देशांवर हेरगिरी करण्यासाठी जो कार्यक्रम आखला होता त्यात ब्राझील सरकार आणि अध्यक्षांवरही गुप्त पाळत ठेवली गेली होती असे स्नोडेनच्या उघड केलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाल्यानंतर ब्राझील मध्ये अमेरिकेविरोधात क्षोभ उसळला आहे. त्या संदर्भात ओबामा यांनी सोमवारी रोसेफ यांच्याशी फोनवरून संफ साधल्यानंतर ही भेट पुढे ढकलली गेल्याचे ओबामा प्रशासनाच्या प्रसिद्धी विभागाने जाहीर केले आहे. अर्थात ही भेट नंतर दोन्ही बाजूंचा वेळ लक्षात घेऊन नंतर ठरविली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
आर्थिक विकास, रोजगार निर्मिती, संरक्षण सल्ला, उर्जा क्षेत्र यात अमेरिका आणि ब्राझील यांच्यात परस्पर सहकार्याचा करार झाला आहे. हे सहकार्य यापुढेही सुरू राहणार आहे. ओबामा यांनी दुसर्यां दा अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच डेल्मा रौसेफ यांना अमेरिका भेटीचे आमंत्रण दिले होते त्यावरून ओबामा प्रशासनाला ब्राझील किती महत्त्वाचे आहे हे दिसून येत असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.